हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. भक्‍ती डाफळे यांना ‘राजमाता जिजाऊ सन्‍मान’ प्रदान !

महाबळेश्‍वर येथे राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्‍या ३६० व्‍या सुवर्णतुला दिनानिमित्त भव्‍य उत्‍सव साजरा ! 

महाबळेश्‍वर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी ६ जानेवारी १६६५ या दिवशी सूर्यग्रहणाचे औचित्‍य साधून स्‍वराज्‍यजननी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला श्री महाबळेश्‍वर मंदिरात केली होती. याच ऐतिहासिक घटनेला तिथीनुसार येत्‍या २९ जानेवारी २०२५ या पौष मौनी अमावस्‍याच्‍या दिवशी ३६० वर्षे पूर्ण झाली, तो क्षण तेथील  शिवभक्‍त ‘मातृगौरव दिन’ म्‍हणून साजरा करतात. त्‍यामुळे २९ जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्‍या ३६० व्‍या सुवर्णतुला दिनाचे औचित्‍य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ, सर्व महिला बचत गट आणि श्री क्षेत्र महाबळेश्‍वर ग्रामस्‍थांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भव्‍य उत्‍सव आयोजित केला होता. हा उत्‍सव गेल्‍या १२ वर्षांपासून होत आहे, तसेच सन्‍मान देण्‍याचे हे दुसरे वर्ष होते. या वेळी समस्‍त ग्रामस्‍थ मंडळ श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर यांच्‍या वतीने ‘राजमाता जिजाऊ सन्‍मान’ हिंदु जनजागृती समिती सातारा येथील रणरागिणी शाखेच्‍या सौ. भक्‍ती दीपक डाफळे यांना देण्‍यात आला.

सौ. भक्‍ती डाफळे यांनी हा सन्‍मान त्‍यांचे गुरु आणि सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍या चरणी समर्पित केला अन् मान्‍यवरांचे आभार मानले. ‘राजमाता जिजाऊंप्रमाणे आदर्श घेऊन प्रत्‍येक महिलेने आपल्‍या मुलांवर हिंदु धर्माचे आणि अध्‍यात्‍माचे संस्‍कार केले, तरच ते आदर्श व्‍यक्‍तिमत्त्व म्‍हणून सिद्ध होतील. यासाठी स्‍वतः साधना करून धर्माचरण करण्‍याचा संकल्‍प आजच्‍या दिवशी करूया’, असे मनोगत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

खासदार नितीनकाका पाटील, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष श्री. नाना वाडेकर, माजी आमदार प्रभाकर घारगे, सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकचे संचालक श्री. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्‍या हस्‍ते भक्‍ती डाफळे यांना सन्‍मानचिन्‍ह, सन्‍मानपत्र देऊन गौरवण्‍यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे हेही व्‍यासपिठावर उपस्‍थित होते.

समाजात जाऊन प्रत्‍यक्ष कार्य करणार्‍या महिलेची पुरस्‍कारासाठी निवड ! – राजेंद्र शेठ राजपुरे, सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे संचालक

पुरस्‍कारासाठी गावातील किंवा आसपासच्‍या गावातील महिलांची निवड न करता समाजात जाऊन प्रत्‍यक्ष कार्य करणार्‍या महिलेची निवड केली, ही चांगली गोष्‍ट झाली. हा पुरस्‍कार शासनाकडून दिला जावा, यासाठीही आम्‍ही प्रयत्न करू. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यासाठी ग्रामस्‍थांनी चांगले प्रयत्न केले आहेत.

शिवव्‍याख्‍याते माननीय श्री. नितीन बानगुडे पाटील यांच्‍या व्‍यतिरिक्‍त अनेक मान्‍यवरांचे मार्गदर्शनही या वेळी झाले. मा. श्री. चंद्रकांत माने शिवशाहीर यांनी वीरश्री निर्माण करणारे पोवाडे सादर केले.

विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती ! 

या कार्यक्रमाला माननीय सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल जाधव, माजी आमदार प्रभाकर घार्गे, खासदार नितीनकाका पाटील, श्री. राजूशेठ राजपुरे, पुजारी संघटनेचे अध्‍यक्ष जीवन महाबळेश्‍वरकर, सरपंच सुनील बिरामणे, समस्‍त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सरपंच श्री. सुनील बिरामणे, श्री. स्‍वरूप राजे खर्डेकर, फलटण; उपसरपंच सौ. कल्‍पनाताई कसम, ग्रामपंचायत सदस्‍य श्री. अनिल कात्रट हे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्‍थित होते.

सौ. भक्‍ती डाफळे यांना मिळालेले सन्‍मानचिन्‍ह आणि सन्‍मानपत्र

सौ. भक्‍ती डाफळे यांना धर्मप्रसार आणि हिंदुत्‍व संघटनेच्‍या कार्यासाठी देण्‍यात आलेल्‍या सन्‍मानपत्रावरील लिखाण !

‘हिंदु जनजागृती समितीच्‍या स्‍थापनेपासून समितीच्‍या माध्‍यमातून धर्मप्रसार आणि हिंदुत्‍व संघटनेचे आपण कार्य करत आहात. हिंदु जनआक्रोश मोर्चामध्‍ये सहभागी होऊन हिंदु माता-भगिनींना मार्गदर्शन केले. तसेच समाजात जाऊन हिंदु धर्माचे महत्त्व, हिंदु राष्‍ट्राची आवश्‍यकता, महिला सबलीकरण या विषयांवर गावोगावी जाऊन आपल्‍या वक्‍तृत्‍व शैलीने समाजजागृती करण्‍याचे काम आपण करत आहात. सर्वच वयोगटातील हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी जिल्‍हाभर विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून व्‍यापक प्रसार करण्‍याचा प्रयत्न आपण यथोचित करत आहात. मनुष्‍याला अत्‍यंत महत्त्वाच्‍या आध्‍यात्मिक मार्गाचे महत्त्व पटवून देण्‍यासाठी आपली तळमळ आपल्‍या कार्यातून दिसून येते. याच कार्यासाठी आम्‍ही आपणास ‘राजमाता जिजाऊ सन्‍मान’ प्रदान करून आपला विशेष सन्‍मान करत आहोत.’