उद्यानात बिबट्याची सफारी चालू करण्याचे निर्देश !
मुंबई – माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री मंत्री आशिष शेलार यांनी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी चालू करा, त्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे सांगितले. याविषयी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. या उद्यानात २ सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंह यांच्या २ सफारी उपलब्ध आहेत.
शासकीय शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबवण्याचे निर्देश
मुंबई – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने विद्यार्थ्यांना पौष्टीक आणि वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंड पुलाव किंवा गोड खिचडी आणि नाचणी सत्त्व यांचा लाभ देण्याचा पर्याय शाळांना देण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
विजेवरील लोकलगाडीला १०० वर्षे पूर्ण
मुंबई – ३ फेब्रुवारी १९२५ या दिवशी कोळशाचे इंजिन सोडून मध्य रेल्वेच्या व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला स्थानक या दरम्यान पहिली उपनगरीय रेल्वे प्रथम विजेवर धावली. इंजिनचा ४ डब्यांसह प्रवास चालू झाला आणि भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला आरंभ झाला. लोकल गाडीच्या १०० वर्षानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
दादर स्थानकावर एक्सप्रेसमध्ये मृतदेह
मुंबई – दादर स्थानकावर उभ्या असलेल्या रणकपूर एक्सप्रेसमध्ये शौचालयात एका व्यक्तीने टॉवेलच्या साहाय्याने आत्महत्या केली असल्याचे लक्षात आले. ही घटना घडली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वेची पडताळणी करण्यात आली आणि शौचालयाचा दरवाजा तोडण्यात आला. या वेळी गाडीत अगदी अल्प प्रवासी होते.