(म्‍हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्‍या अनेक सरदारांना लाच देऊन अधिकृत पत्र घेऊन बाहेर पडले !’ – अभिनेते राहुल सोलापूरकर

अभिनेते राहुल सोलापूरकर यांची वदंती 

मुंबई – ‘पेटारे-बिटारे काहीच नव्‍हते, छत्रपती शिवराय औरंगजेबाच्‍या सरदारांना लाच देऊन आगर्‍याहून सुटून महाराष्‍ट्रात परतले. त्‍यांनी किती हुंडा वटवला, याचे पुरावे आहेत. औरंगजेबाचा वजीर आणि त्‍याच्‍या बायकोलाही लाच दिली, मोईन खान सरदाराकडून स्‍वाक्षरी-शिक्‍क्‍याचे अधिकृत पत्र घेतले. तो परवाना दाखवून शिवाजी महाराज आगर्‍यातून बाहेर पडले. स्‍वामी परमानंद ५ हत्ती घेऊन बाहेर पडले. हा इतिहास गोष्‍ट रूपात सांगायचा की, रंग भरून सांगावे लागते; रंजकता आली की, इतिहासाला छेद जातो’, असे शिवद्रोही आणि इतिहासविरोधी विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. ‘मुक्‍काम पोस्‍ट मनोरंजन’ या यू ट्यूब वाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. इतिहास तज्ञांनी सांगितल्‍यानुसार औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना नजरकैदेत ठेवले. त्‍यांनी डावपेच आखून मिठाईच्‍या पेटार्‍यांमधून सुटका करून घेतली आणि औरंगजेबाच्‍या हातावर तुरी दिली. साधू-संत, मौलवींना फळे, मिठाई वाटणे, सरदारांना इनाम देणे हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘आगर्‍याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक पराक्रम मराठ्यांच्‍या इतिहासात नोंदवला गेला आहे. संपूर्ण जगाच्‍या इतिहासात असे उदाहरण सापडत नाही. असे असतांना सोलापूरकर यांनी याविषयी तुच्‍छतादर्शक विधान करणे हा शिवद्रोह आहे.
  • छत्रपती शिवरायांनी कृष्‍णनीती वापरून हिंदवी स्‍वराज्‍याची म्‍हणजे हिंदु धर्माधिष्‍ठित राज्‍याची स्‍थापना केली. या व्‍यापक ध्‍येयासाठी त्‍यांनी सरदारांना इनामे दिली, यात गैर ते काय ? त्‍याला ‘लाच’ म्‍हणून हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांचा अवमान करून हिंदूंचे खच्‍चीकरण करण्‍याचे दिवस आता संपले आहेत, हे सोलापूरकर यांनी लक्षात घ्‍यावे !