मुंबई – राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणार्या प्रत्येक खलाशाने ‘क्यू.आर्. कोड’ असलेले आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ‘ससून डॉक’ येथे भेट दिली होती. त्या वेळी बहुसंख्य खलाशांकडे आधारकार्ड नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या वेळी मासेमारीसाठी जाणार्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायमस्वरूपी दिसेल, असे रंगवणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसेल, तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगवणे बंधनकारक राहील.
याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नूतनीकरण आणि मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच वरील कार्यवाही न करणार्या नौकांच्या मालकांवर कारवाई करण्यात येईल.