वाळपई, ३१ जानेवारी (वार्ता.) – गुरांची चोरी करून त्यांची अनधिकृतपणे हत्या केल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असलेला उस्मान खान याला सरकारने तडीपार करावे. वाळपई पोलीस ठाण्यावर उस्मान खान याच्या विरोधात अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आहेत. सरकारने या सूत्रांची गंभीर नोंद घेऊन गोवंशियांचे रक्षण करावे, अशी मागणी वाळपई येथील ‘अखिल जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’च्या वतीने करण्यात आली आहे. केंद्रामध्ये ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन
केंद्रा’चे अध्यक्ष हनुमंत परब यांनी एका पत्रकार परिषदेत ही मागणी केली. पत्रकार परिषदेला केंद्राचे खजिनदार लक्ष्मण जोशी, अमरजीत बोराना, सिद्धेश्वर मिश्रा, रघुनाथ धुरी, जयंत मिरिंगकर आदींची उपस्थिती होती.
श्री. हनुमंत परब यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली सूत्रे
१. उस्मान खान याने ३ वर्षांपूर्वी ईद सणाच्या वेळी अवैधपणे मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या केली होती. त्याच्या घराच्या मागील बाजूस गोवंशियांची हाडे सापडली होती आणि रक्ताचे सडे पडले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता आणि त्याला कह्यातही घेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याकडून अशाच प्रकारचा गुन्हा झाला होता.
२. दोन दिवसांपूर्वी ७० हून अधिक किलो गोमांसाची अवैधपणे वाहतूक केल्याच्या प्रकरणी वाळपई पोलिसांनी उस्मान खान याच्यावर कारवाई केली आहे. अशा प्रकारे अनेक घटना त्याच्या नावावर आहेत. यामुळे या भागांत गोवंशियांची अवैध हत्या होतच आहे.
३. सत्तरी भागात अधूनमधून ग्रामीण भागात गुरे चोरली जात आहेत. या प्रकरणीही उस्मान खान याचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
४. राज्यात गोवंशियांची हत्या बंद करावी. यासंबंधी सरकारला अनेक वेळा निवेदने देण्यात आलेली आहेत; मात्र सरकार अजूनही याकडे गंभीरतेने पहात नाही. गोवंश हत्येसंबंधी कायद्यात कडक कारवाई करण्याचे प्रावधान नाही. गोवंश हत्या हा जामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यामध्ये आवश्यक पालट करून अवैध गोवंश हत्या पूर्णपणे बंद केली पाहिजे’’.
गोशाळेचा संशोधनासाठी होणार वापर
श्री. हनुमंत परब पुढे म्हणाले, ‘‘सरकारने राज्यामध्ये पशूवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय चांगला आहे. यामुळे दर्जेदार पशूवैद्य निर्माण होणार आहेत. यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अभिनंदनास पात्र आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे गोवंशियांचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे. या पशूवैद्यकीय विद्यालयाचा गोशाळेला लाभ होणार आहे. पशूवैद्यकीय विद्यालयामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा संशोधनासाठी या गोशाळेमध्ये
येणार आहे. या ठिकाणी असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या जातींच्या गुरांच्या संदर्भात विद्यार्थी अभ्यास करू शकणार आहेत. विद्यार्थी गोवंशियांचे जीवनशास्त्र आणि गुणधर्म शिकू शकणार आहेत. यामुळे गोशाळेचा वापर संशोधनासाठी होणार आहे.’’