३ फेब्रुवारीला श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थानम् येथे सुवर्ण कळसारोहण, ध्‍वजस्‍तंभम् आणि मूर्ती प्राणप्रतिष्‍ठापना !

४५ वर्षांपूर्वी स्‍थापन झालेले सोलापूर येथील देवस्‍थान

सोलापूर – भावनाऋषी पेठ, जुन्‍या वालचंद महाविद्यालयासमोर ४५ वर्षांपूर्वी स्‍थापन झालेल्‍या श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थानम्‌चा सुवर्ण कळसारोहण सोहळा ३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.५० या शुभमुहुर्तावर होणार आहे. ३२ फुटी ध्‍वजस्‍तंभाची आणि परिवार देवतांची प्राणप्रतिष्‍ठापनाही या वेळी होईल. हा सोहळा यादगिरी गुट्टा येथील निवृत्त प्रधान अर्चक नरसिंहाचारी यांच्‍या पौरोहित्‍याखाली देवस्‍थानम् अर्चक नागराजशास्‍त्री आणि शिवराम शास्‍त्री यांच्‍या सहकार्याने दाक्षिणात्‍य वाद्यांच्‍या सुरात होणार आहे. या देवस्‍थानात श्री पंचमुखी हनुमान हा वराह, गरुड, हयग्रीव्‍ह, नृसिंह आणि हनुमान अशा ५ अवतारांत पहायला मिळतो. भक्‍तांच्‍या संकल्‍पनेतून अनेक वर्षांनंतर सुवर्णकळसारोहणाचा योग आला असून यानिमित्त इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. सुवर्ण कळसारोहणम् ध्‍वजस्‍तंभम्, परिवार देवता मूर्ती प्रतिष्‍ठापनानिमित्त आयोजित धार्मिक विधी कार्यक्रमांत भाविकांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन देवस्‍थानचे सचिव सत्‍यनारायण गुर्रम यांनी केले आहे.

१. देवस्‍थानम्‌च्‍या आवारातील ३२ फुटी अखंड शिळेवर सुंदर नक्षीकाम केलेल्‍या ध्‍वजस्‍तंभाची विधीपूर्वक स्‍थापना होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत धार्मिक विधी होतील.

२. २४ घंटे सामूहिक अखंड हनुमान चालिसा सप्‍ताह, रामकोटी जप यज्ञम, श्री श्रीनिवास लक्ष्मी पद्मावती, हनुमान सुवर्चलादेवी, लक्ष्मी नरसिंह, सीताराम, शिवपार्वती कल्‍याणोत्‍सव सोहळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

३. मंदिरात कृष्‍ण शिळेच्‍या पाषाणात सिद्ध केलेल्‍या गणपति, शिवलिंग, नागेंद्र आणि नंदी, मूषक आणि उंट या मूर्तींची प्राणप्रतिष्‍ठापना होणार आहे. या २ फुटी उंचीच्‍या मूर्ती तमिळनाडू येथील महाबलीपूरम् येथून बनवलेल्‍या आहेत.

४. तमिळनाडूतील कुंभकोणम् येथे पंचधातूंनी बनवलेली आकर्षक श्री पंचमुखी हनुमान, ५ अवतारांची वेगवेगळी मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांसह उत्‍सवमूर्तीची उत्‍सव काळात प्रतिदिन सायंकाळी शोभायात्रा काढण्‍यात येईल.

कोट्यवधी रामनामजपाने जागृत अवस्‍था प्राप्‍त झालेले श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थान ! 

४५ वर्षांपूर्वी स्‍थापन केलेल्‍या या मंदिरावर कळसारोहण झाले नव्‍हते. संपूर्ण महाराष्‍ट्रातील एकमेव कृष्‍णवर्ण, पश्‍चिमाभिमुखी, अश्‍वत्‍थवृक्ष सहवासातील लाखो हनुमान चालिसा पठण आणि कोट्यवधी रामनाम जपाने जागृत अवस्‍था प्राप्‍त झालेले श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थान आहे. यामध्‍ये भक्‍तांची श्रद्धा असलेली श्री पंचमुखी हनुमान अवतारातील सर्व विघ्‍ने नाहीशी करणारी गरूडदेवता, सकल संपत्ती प्रदान करणारी हयग्रीवदेवता, भयमुक्‍त करणारी नरसिंहदेवता, संकटात असलेल्‍या भक्‍तांवरील आरिष्‍ट दूर करून ऐश्‍वर्य प्रदान करणारी वराहदेवता या अवतारांचा यामध्‍ये समावेश आहे.

मनाला स्‍फूर्ती देणारे ‘श्रीं’चे विश्‍वरूप आणि नक्षत्र आरती ! 

४५ वर्षांपूर्वी स्‍थापन झालेल्‍या दाक्षिणात्‍य पद्धतीच्‍या, सुबक नक्षीकाम असलेल्‍या विविध देवतांच्‍या सुंदर मूर्तींनी अलंकृत शिखर, आकर्षक रंगसंगतीने सजवलेले भव्‍य महाद्वार, सभामंडपातील हनुमान चालिसा चित्ररूप प्रतिमा, विविध आभूषणांनी सजवल्‍यानंतरचे ‘श्रीं’चे विश्‍वरूप, नक्षत्र आरती, भक्‍तांसाठी विलोभनीय आणि मनाला स्‍फूर्ती देणारी असते. शिवतत्त्व आणि विष्‍णुतत्त्व असलेल्‍या विराट स्‍वरूपाच्‍या या पंचमुखी हनुमान दर्शनाने सकल देवतांचे पूजन केल्‍याचे फळ मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.