९ फेब्रुवारीला ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे करणार कीर्तन

रत्नागिरी – आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाच्या वतीने (कै.) शरद अनंत पटवर्धन स्मृतीनिमित्त ‘गजर कीर्तना’चा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे वारकरी कीर्तन सादर करणार आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हे कीर्तन रंगणार आहे.
संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी एक म्हणजे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी ‘गजर कीर्तना’चा हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली. कार्यक्रमासाठी खल्वायन संस्था सहकार्य करणार आहे.
ह.भ.प.सौ. रोहिणी कौस्तुभ परांजपे यांचे शिक्षण एम्.ए.(संगीतशास्त्र), एस्.एन्.डी.टी. विद्यापीठ, पुणे, एम्.ए .(मराठी) पुणे विद्यापीठ, बी.ए.(कीर्तनशास्त्र), बी.एड्. (पुणे विद्यापीठ) आणि संगीत विशारद (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) येथे झाले आहे. ह.भ.प. कीर्तनकला शेखर नारायणबुवा काणे (कोल्हापूर), राष्ट्रीय कीर्तनकार, ह.भ.प. श्री. न. चि. अपमार्जने (पुणे) आणि राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे (पुणे) हे त्यांना गुरुस्थानी आहेत.
वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी कीर्तन सेवेला प्रारंभ केला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कीर्तन सेवा केली आहे. त्यांना अखिल भारतीय युवा नारदीय कीर्तन संमेलन प्रथम क्रमांक मिळाला आहे. श्री हरि कीर्तनोत्तेजक सभेचा (पुणे) युवती कीर्तनकार, तसेच कीर्तन चंद्रिका पुरस्कार, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने युवा कला गौरव पुरस्कार, उज्जैन (मध्यप्रदेश) येथे झालेल्या नारदीय कीर्तन संमेलनामध्ये कीर्तन रत्न पदवीने सन्मानित आहेत. नारदीय आणि वारकरी या दोन्ही लोकप्रिय कीर्तन परंपरांची सेवा त्या करत आहेत. विविध वाहिन्यांवर त्या कीर्तन करतात.
कीर्तनप्रेमी रसिकांसाठी कार्यक्रम विनाशुल्क असून सन्मानिका ३ ते ८ फेब्रुवारीपर्यंत सुरस स्नॅक्स, परटवणे; पटवर्धन उपाहारगृह, गाडीतळ; रसराज, टिळक आळी; अनंत वस्तू भांडार, मारुति मंदिर;आगाशे स्टोअर्स, नाचणे रोड; समर्थ कृपा, कुवारबाव येथे उपलब्ध होतील. अधिकाधिक कीर्तनप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे.