100th Rocket Launch : इस्रोने केले १०० वे प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संस्था अर्थात् इस्रोने येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून ‘जी.एस्.एल्.व्ही. (जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल ) – एफ्१५’ रॉकेटद्वारे ‘एन्.व्ही.एस्.-०२’ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.  इस्रोची ही १०० वी प्रक्षेपण मोहीम आहे.

इस्रोने सांगितले की, ‘एन्.व्ही.एस्.-०२’ हा उपग्रह नेव्हिगेशन (दिशादर्शन) प्रणालीचा एक भाग आहे, जी भारतातील जी.पी.एस्. (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम) सारख्या नेव्हिगेशन सुविधा वाढवण्यासाठी रचना करण्यात आली आहे. ही प्रणाली काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या भागापर्यंतची माहिती देणार आहे. तसेच किनारपट्टीपासून १ सहस्र ५०० कि.मी.पर्यंतचे अंतरही दाखवणार आहे. यामुळे आकाश, सागरी आणि रस्ते प्रवासासाठी उत्तम दिशादर्शनासाठी साहाय्य होणार आहे. इस्रोची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ या दिवशी त्याची पहिली मोहीम १० ऑगस्ट १९७९ या दिवशी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. तेव्हापासून ३० डिसेंबर २०२४ पर्यंत ९९ मोहिमा पूर्ण करण्यात आल्या.