भारतियांनो, भारताला गौरवशाली करण्यासाठी हे करा !

कै. राजीव दीक्षित

१. पाश्‍चात्त्यांकडे अल्प पैशांत राबणार्‍या भारतियांनी स्वतःच्या राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यांचा विचार करावा !

भारतीय लोक कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे त्यांना अन्य देशांत राबवून घेतले जाते. आपण भारतात शिकतो, येथील ज्ञान घेऊन विदेशात जातो. जो व्यय राष्ट्र येथील व्यक्तींवर करते, त्याचा लाभ अन्य राष्ट्रांना होतो. अशा प्रकारे विदेशात नोकरीसाठी जाणार्‍या भारतियांमुळे अमेरिकेचे १५-२० अरब डॉलर वाचतात. अशा वेळेला प्रश्‍न येतो, तो म्हणजे राष्ट्रभावनेचा. आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य काय आहे, याचा विचार करण्याचा !

२. भारतियांनी स्वतःच्या बुद्धीमत्तेचा राष्ट्रविकासासाठी वापर करावा, यासाठी राष्ट्रप्रेमाचे धडे देणारी शिक्षणप्रणाली निर्माण होणे आवश्यक !

प्रत्येकाला अमेरिका आणि युरोपला जायचे आहे. आपल्या बुद्धीमत्तेचा लाभ आपण दुसर्‍यांना करून देतो; पण इथले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपल्याकडे तरुणच नाहीत. सूची केली, तर न्यूनतम ३६ क्षेत्रांमध्ये भारतातील उच्च तंत्रज्ञान अद्ययावत् होऊ शकते; पण हे कुणालाच करायची इच्छा नाही. भारतात सर्वाधिक अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालये अन् वैज्ञानिक प्रयोगशाळा आहेत. एवढी साधनसामग्री असून भारत अविकसित का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यामागील कारणांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे आपली शिक्षणप्रणाली आपल्याला राष्ट्रप्रेम शिकवत नाही. राष्ट्रपे्रम शिकवणार्‍या शिक्षणप्रणालीचा आपण आग्रह धरला, तर नक्कीच अनेक समस्यांवर तो रामबाण उपाय ठरेल.

३. भारत जागतिक महासत्ता बनण्यासाठी प्रत्येकाच्या नसानसांत राष्ट्रप्रेम जागृत होण्याची आवश्यकता !

भारताचे अस्तित्व टिकवण्यासाठी दंडविधानामध्ये सुधारणा करणे, देशात आर्थिक स्थैर्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षणपद्धतीत पालट करणे, देशात मौलिक चिंतन करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करणे, त्यांच्यातील तंत्रज्ञानाचा देशाच्या विकासासाठी उपयोग करणे आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्याचे उत्तरदायित्व शासनाने उचलणे, या गोष्टींचा भारत शासनाने अवलंब केला, तर भविष्यात भारत एक जागतिक महासत्ता झाल्याशिवाय रहाणार नाही. तसे झाले, तर तोच खर्‍या अर्थाने भारताचा गौरव ठरेल. यासाठी प्रत्येकाच्या नसानसांत राष्ट्रप्रेम जागृत होवो, ही प्रार्थना !’

– स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्व. राजीव दीक्षित