शक्तीपीठ महामार्ग रहित करण्यासाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखणार !

१८ डिसेंबरला रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आंदोलन !

बैठकीत किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख मार्गदर्शन करताना

सांगली, १३ डिसेंबर (वार्ता.) – ‘रत्नागिरी-नागपूर शक्तीपीठ महामार्ग’ रहित करा आणि समर्थन करणार्‍या शेतकर्‍यांना किती मोबदला देणार आहे ? हे सरकारने घोषित केले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (तालुका मिरज) येथे रोखण्याचा निर्णय बाधित शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. येथील ‘कष्टकर्‍यांची दौलत’ येथे ७ डिसेंबर या दिवशी ही बैठक झाली.

२ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शक्तीपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे, त्या ठिकाणी ‘अलायमेंट’ (वेगळा मार्ग) पालटण्यात येईल. काही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येतील’, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्या अनुषंगाने ही बैठक झाली. या बैठकीला किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे, ‘नागरिक जागृती मंचा’चे अध्यक्ष सतीश साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनाला सतीश साखळकरसह शेतकर्‍यांनी पाठिंबा दिला आहे.