खरगोन (मध्यप्रदेश) – येथील निमाड शहरातील ११० वर्षीय संत सियाराम बाबा यांनी ११ डिसेंबर सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी देहत्याग केला. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि आश्रमातच त्यांच्यावर उपचार चालू होते. दुपारी ३ नंतर त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या पार्थिवावर आश्रमाजवळील नर्मदा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या ३ दिवसांपासून आश्रमात जमलेले भाविक त्यांच्या प्रकृतीसाठी भजन गात होते. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सूचनेनंतर डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री यादव ११ डिसेंबरलाच संध्याकाळी बाबांना भेटणार होते.
कोण होते बाबा सियाराम?
बाबा सियाराम निमाड येथे कुठून आले, याची माहिती कुणाकडेही नाही. अंदाजे ६० ते ७० वर्षांपूर्वी बाबा या गावात आले आणि तेव्हापासून ते तैली भट्याण या गावात आश्रम बांधून राहिले. येथे त्यांनी हनुमानच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना केली. तेथे ते सकाळ संध्याकाळ रामनामाचा जप करत असत. तसेच ते रामचरिमानसचेही पठण करत असत.