‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट चित्रपटगृहात न दाखवला गेल्यास दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू !

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचे स्वराज्यासाठी योगदान युवा पिढीपुढे जाणे आवश्यक आहे; मात्र अचानकपणे राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये तो दाखवणे बंद केले आहे. या चित्रपटाऐवजी एक दाक्षिणात्य चित्रपट दाखवला जात आहे, तरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट न दाखवला गेल्यास दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू, अशी चेतावणी ‘आस्था सामाजिक संस्थे’च्या अध्यक्षा स्वाती पिसाळ यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘मानव परिवर्तन आणि विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे’च्या अध्यक्षा राधिका पन्हाळे, मराठा महासंघाचे अनिल घराळ, शिवसेनेचे राजेंद्र माने यांसह अन्य उपस्थित होते. याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी यांना देण्यात येणार आहे.

निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट सत्य इतिहासावर भाष्य करणारा असल्याने तो चालू ठेवावा ! – कोल्हापूरच्या शाहू चित्रपटगृहास निवेदन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या सत्य इतिहासावर भाष्य करणारा असल्याने तो चालू ठेवावा, अशी मागणीचे निवेदन कोल्हापूरच्या हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने येथील शाहू चित्रपटगृह यांना देण्यात आले. या चित्रपटगृहात हा खेळ बंद करण्यात आल्याने हे निवेदन ‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’च्या पुढाकाराने देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून या प्रकरणी कारवाई का करत नाही ? – संपादक) या प्रसंगी आखाड्याचे श्री. दत्ता शिंदे यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे  संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अभिजित पाटील, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर यांसह अन्य उपस्थित होते.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj | Teaser | Thakur Anoop Singh, Amruta Khanvilkar

संपादकीय भूमिका

करमणूक करणार्‍या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे खेळ अल्प होणे हे महाराष्ट्रासाठी निश्‍चितच भूषणावह नाही ! यात शासनाने त्वरित लक्ष घालून या चित्रपटास न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !