अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना दिली चेतावणी
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह यांच्यातील खटल्याची सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यावरून चेतावणी दिली आहे. ‘न्यायालयीन कामकाजाचे दायित्वशून्यतेने किंवा कोणत्याही प्रकारचे चुकीचे अहवाल देणे, हा न्यायालयाचा अवमान आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका अधिवक्त्यांनी या प्रकरणात वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांनी चुकीचे वृत्तांकन केल्याचा आरोप करत न्यायालयात अर्ज प्रविष्ट (दाखल) केला आहे. त्यासमवेतच याविषयी न्यायालयाकडून निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. इतर पक्षांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.
न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा म्हणाले की, न्यायालयाला अपेक्षा आहे की, या खटल्याच्या कार्यवाहीचे वार्तांकन करतांना प्रसारमाध्यमांनी योग्य संयम पाळला जाईल आणि या संदर्भात न्यायालयाच्या आदेशांची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखावे.