Muhammad Yunus Meets Religious Leaders : महंमद युनूस यांनी घेतली बांगलादेशाच्या धार्मिक नेत्यांची भेट !

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणार्‍या अत्याचांराचे प्रकरण

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस

ढाका – इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशात सातत्याने निदर्शने चालू आहेत. बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. त्यामुळे बांगलादेशातील हिंदु समुदाय त्यांच्या सुरक्षेविषयी चिंतित आहे. देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांनी धार्मिक नेत्यांशी संपर्क साधला आहे. युनूस यांनी देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व धर्मांच्या नेत्यांकडून सहकार्य मागितले आहे. तसेच त्यांनी अल्पसंख्यांकांना सुरक्षिततेचे आश्‍वासन दिले आहे. (बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमणांच्या घटना घडल्या असून संपूर्ण जगाने त्या पाहिल्या आहेत. असे असतांना बांगलदेशाच्या सरकारच्या प्रमुखांकडून नुसते आश्‍वासन नव्हे, तर आक्रमणकर्त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची अपेक्षा आहे ! – संपादक)

१. ढाका येथील ‘फॉरेन सर्व्हिस’ अकादमीमध्ये विविध धार्मिक समुदायांच्या नेत्यांशी  बोलतांना युनूस म्हणाले, ‘‘आमच्यात वेगवेगळ्या धर्मांमुळे काही मतभेद असू शकतात; परंतु आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आम्ही सर्व एका कुटुंबाचे सदस्य आहोत आणि सर्वांना समान अधिकार आहेत. आमच्या राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत.’’

२. धार्मिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत युनूस म्हणाले की, अल्पसंख्यांकांवर होणार्‍या आक्रमणांचे सूत्र पुनःपुन्हा उपस्थित केला जात आहे; परंतु वास्तव आणि परदेशी प्रसारमाध्यमांचे दावे यांत भेद आहे.

३. सर्वांच्या सुरक्षेवर भर देत युनूस म्हणाले की, देशात अल्पसंख्यांकांवर आक्रमणाची   घटना घडल्यास अशा घटनेवर कारवाई करून गुन्हेगारांना न्याय मिळवून दिला पाहिजे. कोणीही दोषी आढळल्यास त्याच्या कृत्यासाठी त्याला उत्तरदायी धरले पाहिजे. तसेच अशा घटनांना आळा बसेल, अशी पावलेही उचलली पाहिजेत.

४. युनूस म्हणाले की, प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार मिळायला हवा. हे अधिकार राज्यघटनेतून मिळालेले आहेत आणि ते राखणे हे आपले काम आहे.

संपादकीय भूमिका

आम्ही बांगलादेशी हिंदूंसाठी काही तरी करत आहोत, हे दाखवण्यासाठी बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार युनूस अशा भेटीगाठी घेत आहेत. ‘यातून काहीही साध्य होणार नाही’, हे हिंदू जाणून आहेत !