२.१२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा सेवा करतांना भाव कसा असतो ? देव त्यांना अडचणीच्या वेळी कसे साहाय्य करतो ?’, याविषयी जाणून घेतले. आजच्या भागात आपण त्यांची सेवेची तळमळ, सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आणि त्यांची अहंशून्यता यांविषयी पाहूया.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : sanatanprabhat.org/marathi/859511.html
७. पू. ताईंवर देवाने चैतन्य आणि गुरुकृपा यांचा वर्षाव करणे
पू. वटकर : मला पाठीचा त्रास आहे. मी केवळ अर्धा घंटा आसंदीत बसू शकतो; मात्र पू. ताई, तुमच्याशी बोलायला आरंभ केला आणि सव्वा घंटा कधी गेला, हे कळलेच नाही. या चैतन्यमय संवादामुळे मला देहभान विसरून आनंद मिळत आहे.
पू. ताई : आता असे लक्षात येते की, पुष्कळ कालावधीपासून माझे अंग, हात, चेहरा आणि कपडे यांवर पुष्कळ दैवी कण मिळतात. मला प्रतिदिन दैवी कण मिळतात. ‘देव मला पुष्कळ प्रमाणात साहाय्य करतो. त्याचे माझ्याकडे लक्ष आहे. ‘मला त्याच्याकडून येणारा चैतन्याचा झोत मिळतो, तो माझ्यावर कृपेची वृष्टी करतो’, असे पुष्कळ वेळा जाणवते. ‘कधी कधी माझ्या शरिरातून प्रकाश बाहेर पडतो’, हे माझे छायाचित्र पाहिल्यावर माझ्या लक्षात आले.
८. पू. ताईंना शारीरिक आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असतांनाही देवाने त्यांच्याकडून व्यापक सेवा करून घेणे अन् त्यांना आनंदी ठेवणे
पू. वटकर : एकीकडे देवाचे अस्तित्व आहे, तर तुम्हाला आध्यात्मिक त्रासही फार आहे.
पू. ताई : मला आध्यात्मिक त्रास नाही, तर माझ्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होतात, उदा. महाभारतामधील अर्जुनाच्या रथावर मारुति होता. तो रथाचे रक्षण करत होता. युद्ध संपल्यावर अर्जुन आणि श्रीकृष्ण रथावरून खाली उतरले. श्रीकृष्णाने मारुतीला त्याचे कार्य झाल्याचे सांगितले. मारुति निघून गेल्यावर त्या रथाचा स्फोट होऊन चिंधड्या झाल्या. त्याप्रमाणे मला वाटते, ‘सत-असत्च्या लढ्यातील आपले शरीर ही युद्धभूमी आहे. प्राण हा मुख्य आहे. परात्पर गुरु डॉक्टर हे आपले सारथी आहेत. ते नसते, तर ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींपुढे आपला टिकाव लागला नसता. त्या रथाप्रमाणे आपल्या शरिराच्या चिंधड्या झाल्या असत्या. माझ्या शरिरात पुष्कळ गाठी झाल्या आहेत. ती काळ्या (त्रासदायक) शक्तींची केंद्रे आहेत. केवळ परात्पर गुरु डॉक्टर यांच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो; म्हणून आपल्यात जीव आहे. दिवसातील किमान २ घंटे वेळ या त्रासामध्ये जातो. कधी कधी दिवसातून २ – ३ वेळा असा त्रास होतो. याचा मला पुष्कळ शारीरिक त्रास होतो. काही वेळा मला घुसमटल्यासारखे होऊन श्वास घेता येत नाही. वेदना होतात. थकवा येतो. रात्री अपरात्री केव्हाही त्रास चालू होतो. असा एकही दिवस नसतो की, मला त्रास होत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर तडफडतो, तसे माझे होते. त्या वेळी संत आणि सद़्गुरु माझ्यासाठी नामजपादी उपाय करतात. ‘त्यांच्या कृपेमुळे मी जिवंत आहे’, असे वाटते.
पू. वटकर : त्रासात एवढा वेळ गेल्यावर सेवेसाठी अल्प वेळ मिळत असेल ना ? त्रासामुळे होणारा शारीरिक परिणाम नंतरही रहातो. एवढे असूनही परात्पर गुरु डॉक्टर तुम्हाला जिवंत ठेवून सेवा करून घेतात.
पू. ताई : केवळ जिवंत नाही, तर आनंदी ठेवतात. ते सेवा किती करून घेतात, हे लक्षात येत नाही; पण मला आनंदी ठेवतात.
९. पू. ताईंनी पू. वटकरकाकांना नमस्कार केल्यावर त्या ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण धरत आहेत’, असे वाटणे
पू. वटकर : माझ्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला भेटवस्तू दिली. तेव्हा तुम्ही अकस्मात् मला नमस्कार केल्यावर मी भावावस्थेत गेलो. तेव्हा मला काही कळत नव्हते. सनातनमध्ये स्थुलातून नमस्कार करणेे नसते; पण ‘तुम्ही काय करत होतात ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा ‘तुम्ही परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण धरत आहात’, असे मला वाटले. मला केवळ भावावस्थेतील आनंद मिळत होता.
पू. ताई : मला अंतर्मनातूनच देवाने सांगितले की, ‘पू. काकांचे चरण धर.’
पू. वटकर : मला वाटले की, ते माझे चरण नाहीत. तुम्ही परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण धरले आहेत, तर असू द्या. माझे त्यात काही नाही. मी भावावस्थेतील आनंद घेत होतो.
पू. ताई : मीही भावावस्थेत होते. मलाही फार आनंद मिळाला.
१०. सेवा करत असतांना ‘स्वतःची साधना आणि प्रगती व्हावी’, असे विचार न येता केवळ जीवनाचे कर्तव्य म्हणून सेवा करणे आणि शिकण्याच्या स्थितीत रहाणे
पू. वटकर : आपण जी साधना आणि सेवा करता, त्या वेळी ‘स्वतःकडून चुका होऊ नयेत, अध्यात्मात प्रगती व्हावी, परात्पर गुरु डॉक्टरांची आणखी कृपा व्हावी’, असे विचार असतात का ?
पू. ताई : नाही. सेवेच्या वेळेत ‘सेवा आणखीन आणखीन चांगली व्हावी’, एवढेच विचार असतात. सेवेचा ध्यास लागलेला असतो. आध्यात्मिक प्रगती इत्यादींचा मला विसर पडतो. ‘सेवा करणे हेच आपल्या जीवनाचे कर्तव्य आहे’, असे वाटते.
पू. वटकर : सर्वसाधारण साधकाला ‘सेवा ही साधना म्हणून झाली पाहिजे, यातून माझी प्रगती झाली पाहिजे’, असे वाटते.
पू. ताई : मला थोडे उलट वाटते. मी सकाळी उठल्यावर देवाची क्षमा मागते, ‘देवा, माझ्याकडून कळत-नकळत चुका झाल्या. मी तुझी अनंत अपराधी आहे. मला माझ्या अपराधांची व्याप्ती आणि मर्यादा कळू शकत नाही. तू मला केवळ क्षमा कर. तू माझ्यावर कार्य सोपवले आहेस; पण ‘ते योग्य रितीने कसे करायचे ?’, हे समजण्याची माझी क्षमता नाही. माझे काहीही चुकत असेल, तर तू मला क्षमा कर.’ अशी क्षमा मागितल्यामुळे ‘आपण काहीतरी चांगले करतो’, असे मला वाटतच नाही. मला वाटते, ‘आपण जे करतो, याच्यापेक्षाही आणखी काहीतरी वेगळे आणि चांगले असू शकते.’
मी जे काही करते, ‘ते माझ्या स्थितीला परिपूर्ण आहे’, हे मी म्हणू शकत नाही. मी जे करते, ते मला सर्वोत्कृष्ट (बेस्ट) वाटते; परंतु ‘देवाच्या दृष्टीने आणखी काही चांगले असेल’, हे मला ठाऊक नाही. त्यासाठी मी देवाला सांगते, ‘जे सर्वोत्कृष्ट आहे, ते मला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शिकव. तू कुठल्याही माध्यमातून शिकवलेस, तरी ते मला कळू दे. तुला कुठलेच रूप नाही आणि सगळीच रूपे तुझी आहेत. त्यामुळे तू मला मुंगीच्या माध्यमातूनही शिकवलेस, तरी ते मला ओळखता येऊदे. ते ओळखण्याची मला बुद्धी दे, ते पहायला मला शिकव.’ असे केल्यामुळे माझ्याकडून शिकणे होतेे. तीही देवाचीच कृपा आहे.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.११.२०२०)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/860839.html
|