आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांना अविरत मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांचा पू. शिवाजी वटकर यांच्‍याशी झालेला संवादरूपी सत्‍संग !

३.१२.२०२४ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. 

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/859821.html

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

११. पू. ताईंची सेवेची तळमळ आणि सेवेचा वेग पुष्‍कळ असणे

पू. वटकर : तुम्‍ही झोकून देऊन केवळ कर्तव्‍य म्‍हणूनच सेवा करता, हे शिकायला मिळाले.

पू. ताई : हो. सेवा म्‍हणजे मला माझे आद्य कर्तव्‍य वाटते. बाकी सर्व नंतर.

पू. वटकर : त्‍यामध्‍ये ‘सेवा व्‍हायलाच पाहिजे’, असे काही ध्‍येय असते का ? 

पू. ताई : ‘सेवा पूर्ण झाली पाहिजे. सेवेतून देवाला अपेक्षित कार्य साध्‍य झाले पाहिजे. ज्‍या साधकांशी बोलायचेे आहे, ते बोलणे झाले पाहिजे. नियोजन केल्‍याप्रमाणे सेवा पूर्ण झाली पाहिजे’, असे माझ्‍या मनात असते.

पू. वटकर : त्‍यात अपेक्षेचा भाग येतो का ?

पू. ताई : कसली अपेक्षा ?

पू. वटकर : काही वेळा सेवा जमत नाही. ‘ठरवलेली सेवा झालीच पाहिजे, नाही झाले, तर मनाची स्‍थिती थोडी अस्‍थिर होते का ?’

पू. ताई : त्‍या वेळी मला ‘अरे ! हे सूत्र फार दिवसांपासून राहिले आहे, ते पूर्ण व्‍हायला पाहिजे’, असे मला वाटते.

पू. वटकर : येथे ‘वाटणे’ ही तुमची तळमळ झाली. समजा आपण काहीतरी ठरवलेले असते आणि काही अडचणीमुळे किंवा मर्यादेमुळे ते झाले नाही, तर त्‍याच्‍या नंतरची मनाची स्‍थिती कशी असते ?

पू. ताई : त्‍या वेळी वाटते की, अजून सेवा पूर्ण होण्‍याची वेळ आलेली नाही, उदा. एखाद्या सूत्राविषयी चर्चा करून काही सूत्रे सांगायची असल्‍यास अनेक अडचणी येतात. ‘त्‍या साधकाच्‍या मनाची स्‍थिती ठीक नसते, तो गावाला जातो, त्‍या सूत्राच्‍या संबंधित साधकांना वेळ नसतो’, अशा अडचणी आल्‍याने ती सेवा पुढे जाते. तेव्‍हा थोडे वाटते की, झाले तर बरे होईल. प्रश्‍न पटकन सुटला, तर बरे होईल; पण याचा नियोजनकर्ता भगवंतच आहे. ज्‍या वेळेला ते होणे देवाला अपेक्षित असते, त्‍याच वेळेला होऊन जाते.

पू. वटकर : यात अपेक्षा आली नाही; पण ठरवल्‍याप्रमाणे सेवा न झाल्‍यामुळे निर्माण झालेली परिस्‍थिती स्‍वीकारली जात नसेल, तर ती अपेक्षा झाली.

पू. ताई : एखादी सेवा पूर्ण झाली नाही, तर त्रास किंवा त्रागा होत नाही.

पू. वटकर : म्‍हणजे ईश्‍वरेच्‍छा म्‍हणून स्‍वीकारले जाते. तो भाग फारच चांगला आहे.

पू. ताई : माझ्‍याकडे अभ्‍यासासाठी अनेकदा अनेक सूत्रे येतात आणि ती प्रलंबित रहातात. सहसाधकांची संख्‍या अल्‍प असते. दिवाळीच्‍या सुटीत पुष्‍कळ साधक घरी जातात. त्‍यामुळे सर्व सूत्रांना न्‍याय देता येत नाही. काही साधकांना वाटते की, त्‍यांनी सांगितलेले झाले नाही; पण माझ्‍या मनात तेव्‍हा स्‍पष्‍टीकरणाचे विचार येत नाहीत. देव मला निर्मळ मनाने क्षमा मागायला शिकवतो. मी साधकांना स्‍पष्‍टपणे सांगून ‘मला क्षमा करा’, असे सांगू शकते.

पू. वटकर : म्‍हणजे तुम्‍ही नेहमी अंतर्मुख असता.

पू. ताई : हो, अंतर्मुखता असते.

पू. शिवाजी वटकर

१२. पू. ताईंची शिकण्‍याची वृत्ती 

पू. वटकर : तुमच्‍यातील अंतर्मुखता, देवावरील श्रद्धा इत्‍यादी गुण माझ्‍यातही आले, तर बरे होईल.

पू. ताई : आता तुम्‍हीच मला सांगा. मी काय करू ?

पू. वटकर : तुम्‍हाला देव सांगतो, ना !

पू. ताई : मला देव सांगतो; पण तुमच्‍या माध्‍यमातूनही देवच सांगेल.

पू. वटकर : ‘देव तुमच्‍याकडून आता जसे साधनेचे प्रयत्न करून घेत आहे, तसेच करत रहायचे’, असे मला वाटते. देव एवढे करून घेतो, तर आपण कृतज्ञताभावात आणि आनंदातच राहूया.

पू. ताई : मी भाववृद्धीसाठी काय प्रयत्न करू ? भावाच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यात जाण्‍यासाठी काय प्रयत्न करू ?

पू. वटकर : सेवा करतांना तुमचा भाव असतोच, उदा. ‘देवच करून घेत आहे, देवच सर्वकाही करत आहे.’ तुम्‍ही त्रयस्‍थ राहून देवाची लीला अनुभवता. तुमची सेवा भावाच्‍या स्‍तरावरच होत आहे. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावसत्‍संग आणि भक्‍तीसत्‍संग घेत आहेत. त्‍या उच्‍च कोटीच्‍या संत असून उच्‍च आध्‍यात्मिक स्‍तरावर आहेत, तरीही त्‍या देवाला किती आळवतात ! त्‍यांच्‍याप्रमाणे मोठ्या संकटाच्‍या वेळीही माझ्‍यासारखा सर्वसाधारण साधक देवाला आळवू शकणार नाही. त्‍यांची देवाप्रती अंतर्मनापासून शरणागती असते. त्‍या कितीतरी वेळ किती आर्ततेने जोगवा मागत होत्‍या. मी तसे करू शकत नाही; पण त्‍या स्‍थितीला जाण्‍याचा प्रयत्न करूया.

पू. ताई : हो, त्‍यांची आर्त शरणागती असते.

पू. वटकर : त्‍यांच्‍याकडे सर्वकाही (चैतन्‍यशक्‍ती) असूनही एवढी शरणागती असते. नुसती शरणागती नाही, तर त्‍या देवाला आळवतच रहातात. त्‍या स्‍वतः आदिशक्‍ती असतांना आदिशक्‍तीला आळवतात.

पू. ताई : खरंच आहे. एक शक्‍ती दुसर्‍या शक्‍तीला आळवते.

१३. पू. ताईंची अहंशून्‍यता 

पू. ताई : तुमचे निरीक्षण किती छान आहे ! तुम्‍ही किती छान सेवा करता !

पू. वटकर : मी तुम्‍हा सर्वांकडून शिकण्‍याचा प्रयत्न करतो.

पू. ताई : तुमचा अहं अल्‍प आहे. पू. काका, माझाही अहं तुमच्‍यासारखा अल्‍प होऊ दे.

पू. वटकर : ‘माझ्‍यात अधिक अहं आहे’, असे पूर्वी तुम्‍ही म्‍हणाला होता. प्रत्‍यक्षात माझ्‍यापेक्षा अहं अल्‍प असण्‍यासाठी प्रथम तुम्‍हाला तुमचा अहं वाढवावा लागेल आणि नंतर तो कमी करावा लागेल; हे फारच कठीण आहे. यासाठी देवाने जे आता दिले आहे, ते ठीक आहे.

पू. ताई : तुम्‍ही विनोदही करता. तुम्‍ही वयस्‍कर असूनही तुम्‍हाला पूर्वीचे सर्व आठवते. मी तरुण असूनही माझी बुद्धी तीक्ष्ण नाही. परात्‍पर गुरु डॉक्‍टरही म्‍हणतात, ‘तुमचा अहं अल्‍प आहे.’ त्‍यांनी तुमच्‍या लिखाणावर ‘तुमची अहंशून्‍यता कशी आहे ?’ याविषयी लिखाण केले होते. तुम्‍ही संत असूनही असे आहात, धन्‍य धन्‍य !

पू. वटकर : ‘मी संत आहे’, असे मला वाटत नाही. ‘मी कुठलेही काम करतांना संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवण्‍याचा प्रयत्न करतो, उदा. साधकाकडून भोजनगृहात एखादे खरकटे भांडे धुण्‍याचे राहिले असेल, तेव्‍हा ते भांडे धुतांना मला वाटते की, ‘मला संतसेवाच मिळाली आहे; कारण तो सनातनचा, म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा साधक आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍या साधकाला कधीतरी संत करतीलच.’ तसेच ‘अलीकडे मला साधकांच्‍या समवेत सहजतेने आणि मैत्रीपूर्वक वागावे’, असे वाटते. साधकांविषयी पुष्‍कळ आपुलकी वाटते. आता मी साधकांंना साहाय्‍य म्‍हणून त्‍यांच्‍या चुकाही सांगतो. यामुळे साधक आणि संत यांतील भेद माझ्‍या लक्षात येत नाही.

पू. ताई : तुमचा भाव किती छान आहे ! अहंशून्‍यतेमुळे असे होते. तुमच्‍यात प्रेमभाव, सहजता आणि तत्त्वनिष्‍ठताही आहे.

पू. वटकर : तुम्‍ही देवद आश्रमातील सर्व संतांमध्‍ये लहान असूनही आम्‍हा सर्वांना साधनेत मुक्‍ताबाईंसारखे  साहाय्‍य करता. आमच्‍या साधनेची घडी बसवत आहात आणि आम्‍हाला तुमच्‍यासारखे घडवत आहात.

समारोप  

वरील संवादाच्‍या वेळी पू. ताई पुष्‍कळ स्‍थिरतेने, सहजतेने, नम्रतेने (प्रत्‍येक वेळी त्‍यांनी पू. काका म्‍हणणे) आणि अनुसंधानात राहून बोलत होत्‍या. ‘त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द ऐकतांना देवच माझ्‍याशी प्रत्‍यक्ष बोलत आहे’, असे मला वाटले. त्‍या स्‍वतःविषयी काही सांगत नसून ‘देव त्‍यांच्‍याकडून दैवी कार्य कसे करवून घेत आहे’, याविषयी सांगत होत्‍या. ‘त्‍या देवाची स्‍तुती करत होत्‍या, म्‍हणजे स्‍तोत्र म्‍हणत होत्‍या’, असे मला वाटले. देव पू. ताईंना महालक्ष्मी, महासरस्‍वती आणि महाकाली यांची प्रसंगानुरूप रूपे देऊन कार्य करवून घेतो. त्‍यांच्‍याकडील नेतृत्‍वगुण, नियोजनकौशल्‍य, गुर्वाज्ञापालन, सतर्कता, संयम, प्रीती, विशालता, तत्त्वनिष्‍ठता, अहंशून्‍यता, सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमता इत्‍यादी गुण मला शिकायला मिळाले.

प्रार्थना 

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी देवद आश्रमातील साधकांना पू. ताईंच्‍या रूपात चालते-बोलते अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय दिले आहे. वरील शिकायला मिळालेली सूत्रे म्‍हणजे पू. ताईंच्‍या सागररूपी ज्ञानातील अल्‍पसे ज्ञानजल आहे. मी जे त्‍यांच्‍याकडून ऐकले, मला जे ग्रहण करता आले आणि माझ्‍या अल्‍प मतीला आकलन झाले, ते ज्ञान देवाने माझ्‍याकडून शब्‍दांत मांडून घेतले. आम्‍हा साधकांना यातून शिकून पू. ताईंसारखी साधना करण्‍याची प्रेरणा मिळो, अशी मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.   (समाप्‍त) 

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक