पाय मुरगळल्‍यावर नामजपादी उपाय केल्‍यावर गुरुदेवांच्‍या कृपेने अल्‍पकाळातच पाय पूर्णतः बरा होणे

श्री. शंभुराजे कुलकर्णी

१. सेवा करण्‍यासाठी जिन्‍यावरून खाली जातांना पायरीवरून पाय घसरून डावा पाय मुरगळणे 

‘५.५.२०२४ या दिवशी कागल, जिल्‍हा कोल्‍हापूर येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘युवा शिबिर’ आयोजित केले होते. तेथे एक सेवा करण्‍यासाठी मी जिन्‍यावरून खाली जात होतो. खाली जातांना मला जिन्‍याची शेवटची पायरी दिसली नाही आणि माझा डावा पाय मुरगळला. डाव्‍या पायाला पुष्‍कळ वेदना होत होत्‍या. मी थोडा वेळ तेथेच भूमीवर बसलो. नंतर चालतांना पायाला पुष्‍कळ त्रास होत होता. त्‍यानंतर दोन घंट्यांत माझा पाय पूर्ण सुजला. माझ्‍या पायाचा घोटासुद्धा दिसत नव्‍हता. मी एका पायाने लंगडत चालत होतो. एका साधकाने माझ्‍या त्‍या पायाचे भ्रमणभाषवर छायाचित्र काढले. तो म्‍हणाला, ‘‘हे छायाचित्र रामनाथी आश्रमात पाठवतो, म्‍हणजे कशामुळे हे झाले आणि त्‍यासाठी नामजपादी उपाय कोणते करायचे ?’, हे आपल्‍याला कळेल.’’

२. आधुनिक वैद्यांनी ‘फ्रॅक्चर झाले असावे’, असे सांगून वेदना आणि सूज तात्‍पुरती न्‍यून होण्‍यासाठी गोळ्‍या देणे 

मी घरी पोचल्‍यानंतर जवळ असलेल्‍या आधुनिक वैद्यांकडे गेलो. ते म्‍हणाले, ‘‘पाय पुष्‍कळ सुजला आहे. ‘फ्रॅक्चर’ असावे. एक्‍स-रे (‘क्ष-किरण’ चिकित्‍सा) काढून बघावे लागेल.’’ त्‍यांनी वेदना आणि सूज तात्‍पुरती न्‍यून होण्‍यासाठी गोळ्‍या दिल्‍या.

३. पाय मुरगळण्‍यावर दिलेला मंत्रजप केल्‍यावर दीड दिवसातच पायाची सूज उतरणे आणि पाय पूर्ण बरा होऊन सनातनच्‍या रामनाथी आश्रमात जाता येणे 

रात्री ९ वाजता रामनाथी आश्रमातून निरोप आला, ‘साधकाला होत असलेला त्रास अनिष्‍ट शक्‍तीच्‍या त्रासांचा परिणाम आहे.’ त्‍यासाठी निरोप देणार्‍यांनी पुढीप्रमाणे नामजपादी उपायही सांगितला. ‘हाताची पाचही बोटे एकत्रित करून स्‍वाधिष्‍ठान चक्राजवळ न्‍यास करायचा आणि ‘श्री गणेशाय नमः । श्री हनुमते नमः । श्री हनुमते नमः। ‘ॐ नमः शिवाय । ‘ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप दिवसातून दोन घंटे करायचा. रात्री झोपण्‍यापूर्वी माझा ४० मिनिटे नामजप झाला. सकाळपर्यंत पायाची ७० टक्‍के सूज न्‍यून झाली होती. मला व्‍यवस्‍थित चालता येऊ लागले. मला वेदनाही होत नव्‍हत्‍या. गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेने दीड दिवसातच माझा पाय पूर्ण बरा झाला आणि ७.५.२०२४ या दिवशी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात एका शिबिरासाठी जाऊ शकलो. गुरुदेवांची माझ्‍यावर झालेली ही मोठी कृपाच होती.

गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. शंभुराजे किरण कुलकर्णी, कागल, जिल्‍हा कोल्‍हापूर. (वय २० वर्षे) (६.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक