पनवेल येथे कळंबोली सर्कलच्या ठिकाणी सिग्नलविरहित इंटरचेंज होणार !

  • ४ रस्ते विकसित होणार

  • ५ उड्डाणपूल बांधले जाणार

प्रस्तावित सिग्नलविरहित इंटरचेंज

पनवेल – येथील कळंबोली सर्कलच्या ठिकाणी सिग्नलविरहित इंटरचेंज उभारला जाणार आहे. येत्या ३ वर्षांत येथील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे. सिग्नलविरहित रस्त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बरोबरीने २ टप्प्यांवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी असलेल्या या प्रकल्पाचे काम पनवेलचे ‘टी.आय.पी.एल्.’ आस्थापन करत आहे.

१. जे.एन्.पी.टी., स्टीलमार्केट, शिळफाटा, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, पनवेलमधून जाणारा जुना मुंबई-पुणे महामार्ग, जे.एन्.पी.टी.ला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग अशा वेगवेगळ्या रस्त्यांना कळंबोली सर्कल येथून जोडले जाते.

२. मुंब्र्याहून जे.एन्.पी.टी.च्या दिशेने, जे.एन्.पी.टी.हून मुंब्राच्या दिशेने, जे.एन्.पी.टी.हून मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईतून जे.एन्.पी.टी.ला जाण्यासाठी ४ रस्ते विकसित केले जाणार आहेत. ४ रस्त्यांची एकूण लांबी ५ कि.मी. असेल.

३. जे.एन्.पी.टी. ते पुण्याला जाण्यासाठी, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी, पनवेलहून येणार्‍या रस्त्यावर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी, मुंब्रा मार्गाने आल्यास पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गाच्या दिशेने जाण्यासाठी, शिळफाट्याहून स्टीलमार्केटच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओलांडून एकमेकांशी जोडणारे ३ कि.मी. लांबीचे ५ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. इंटरचेंज रस्त्याची ही पहिली लेव्हल म्हणजेच पहिला मजला असेल.