‘मी गणेशचतुर्थीच्या कालावधीत माहेरी (सावर्डे, रत्नागिरी) गेले होते. तेव्हा मी सौ. वनिता बांद्रे यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्या वेळी लक्षात आलेली त्यांच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. भावाच्या आणि सकारात्मक स्थितीत असलेल्या सौ. वनिता बांद्रे !
१ अ. स्वतःच्या आजारपणाविषयी काही न बोलता संतांविषयी बोलून पूर्णवेळ भावावस्थेत रहाणार्या सौ. बांद्रेकाकू ! : सौ. बांद्रेकाकू या सावर्डे येथील जुन्या साधिका आहेत. पूर्वी त्यांच्या बोलण्यात व्यावहारिक विषय असायचे. या वेळी मात्र त्या पूर्णवेळ भावावस्थेत आणि सकारात्मक स्थितीत होत्या. त्यांनी मला आजारपणाविषयी काही न सांगता ‘स्वतः अनुभवलेली गुरुकृपा आणि आलेल्या अनुभूती’ यांविषयी सांगितले. त्या पूर्णवेळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयीच बोलत होत्या.
१ आ. साधकांच्या सत्संगामुळे आनंदी होणे : काकूंमधील प्रेमभाव पुष्कळ वाढला आहे. साधक आल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या वेळी त्या स्वतःच्या तीव्र वेदनाही विसरून जातात.
१ इ. भाववृद्धीच्या प्रयत्नांमुळे स्थिर रहाणे : काकूंनी आजारपणात विविध तपासण्या, तसेच उपचार घेतांना भाववृद्धीचे वेगवेगळे प्रयत्न केले. त्यामुळे ‘त्या स्थिर राहू शकल्या’, असे माझ्या लक्षात आले.
१ ई. संतांप्रती भाव : सौ. बांद्रेकाकू यांचे भाऊ पू. (कै.) तुकाराम वनगे महाराज आणि त्यांचे दीर पू. ह.भ.प. (कै.) सखाराम बांद्रे महाराज हे दोघेही संत होते. काकूंचा त्यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. कठीण काळामध्ये ‘गुरुदेवांचे अनुसंधान’ हेच त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऊर्जा पुरवणारे माध्यम आहे.
२ आ. ‘आजारपण’ ही परात्पर गुरु डॉक्टरांजवळ जाण्याची सुवर्णसंधी असून ‘भाववृद्धीचे प्रयत्न केल्याने आजारावर मात करता येऊ शकते’, हे सौ. बांद्रेकाकूंकडून शिकायला मिळणे : खरेतर अंतिम क्षणापर्यंत स्वतः समवेत गुरुदेवांविना कुणीही नसते; परंतु ही जाणीव न्यून झाल्याने आपले मन दुःखी होते. ‘आजारपणात गुरुदेवांविना अन्य कुणीच नाही’, ही स्थिती प्रत्येक जण अनुभवतो आणि गुरुदेवांच्या आणखी जवळ जातो. जणू आजारपणात गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्याची सुवर्णसंधीच मिळत असते. त्यामुळे ‘आजारपणाविषयी भीती किंवा ताण न घेता भाववृद्धीचे प्रयत्न केले, तर भीतीवर सहजतेने मात करता येऊ शकते’, हे मला काकूंच्या प्रयत्नांतून गुरुदेवांनी शिकवले. काकूंमधील भावामुळे माझाही भाव जागृत झाला आणि मला एक वेगळीच आनंदाची स्थिती अनुभवता आली.
‘हे गुरुदेवा, मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा आणि मी जे शिकले, ते मला कृतीत आणता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२४)