‘अन्नदान’ आणि ‘रामनाम’ यांचा उपदेश करणारे संतश्री जलारामबापा !

आज ‘संतश्री जलारामबापा जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

कार्तिक शुक्ल सप्तमी, म्हणजेच ८ नोव्हेंबर या दिवशी रामभक्त ‘संतश्री जलारामबापा जयंती’ आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आपण थोडक्यात बघूया.

संतश्री जलारामबापा

१. संतश्री जलारामबापा यांची शिकवण

श्री. मानव बुद्धदेव

गुजरातमधील विरपूर या गावातील प्रसिद्ध संतश्री जलारामबापा यांनी त्यांच्या जीवनातून ‘अन्नदान’ आणि ‘रामनाम’ हे २ मुख्य उपदेश समाजाला दिले. संतश्री जलारामबापा यांनी त्यांच्या हयातीत चालू केलेले अन्नदानाचे सेवाकार्य विरपूर या त्यांच्या जन्मस्थळी श्री जलाराम मंदिरात आजही अविरतपणे चालू आहे. केवळ गुजरातच नव्हे, तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड यांसह इतर अनेक राज्यांमध्ये संतश्री जलारामबापा यांची मंदिरे आहेत, जेथे भजन-संकीर्तनासह अन्नदानाची सेवा विशेषत्वाने केली जाते.

२. संतश्री जलारामबापा यांनी मृत पक्ष्यांना जिवंत करणे

संतश्री जलारामबापा गोरगरीब आणि साधूसंत यांना प्रतिदिन जेवू घालायचे अन् त्यांच्या गावातून कुणी बाहेरचे यात्रेकरू जातांना दिसले, तर त्यांना थांबवून ते आग्रहाने घरी घेऊन यायचे. असेच एकदा गावाच्या वेशीवरून काही अरबी मुसलमान प्रवासी जात असतांना संतश्री जलारामबापा यांना दिसले. त्यांच्याकडे तोंड बांधलेल्या मोठ्या पिशवीमध्ये मारलेले पक्षी होते. त्यामुळे ते संतश्री जलारामबापा यांच्या घरी यायला सिद्ध होत नव्हते. त्यांना भीतीपूर्ण संकोच वाटत होता; पण शेवटी त्यांना त्यांच्या आग्रहासमोर हार पत्करावी लागली.

जेव्हा ते अरबी मुसलमान संतश्री जलारामबापा यांच्या अंगणी जेवण करत होते, तेव्हा त्यांना जेवण वाढता वाढता मध्येच जलारामबापा यांनी त्यांच्या त्या पिशवीला स्वतःकडील काठीने स्पर्श केला. त्या वेळी ते म्हणाले, ‘जा पक्ष्यांनो, जंगलात जाऊन मनसोक्त फळे खा. आता तुम्हालाही भूक लागली असेल.’ त्यांचे हे वाक्य पूर्ण होताच पिशवीतील मृत पक्षी जिवंत होऊन बाहेर आकाशाकडे झेप घेऊ लागले आणि काही क्षणातच सर्व पक्षी उडून गेले.

हा चमत्कार पाहून त्या अरबी मुसलमानांना पुष्कळच आश्चर्य वाटले. ‘संतश्री जलारामबापा यांना कसे ठाऊक झाले की, पिशवीत मारलेले पक्षी आहेत आणि त्यांनी त्यांना काठीच्या स्पर्शाने जिवंत कसे केले ?’, हे प्रश्न अवाक् होऊन बघत असलेल्या त्या अरबी मुसलमानांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकले होते. त्यांनी संतश्री जलारामबापा यांची क्षमा मागत त्यांच्या चरणावर डोके ठेवून शपथ घेतली, ‘आता यापुढे कधीही जीव हत्या करणार नाही.’

पुढे एका मुसलमानाचा मुलगा जमाल मरणासन्न अवस्थेत असतांना संतश्री जलारामबापा यांना नवस केल्याने तो वाचला. तेव्हा संतश्री जलारामबापा यांच्या घरी येऊन त्याने मुलाच्या प्राणरक्षणासाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि ‘जला सो अल्ला’ (जलारामबापा माझ्यासाठी अल्लाच आहेत), असे म्हणत त्याने त्यांच्या चरणावर डोके ठेवले.

– श्री. मानव बुद्धदेव, अमरावती. (५.११.२०२४)