निवडणूक विशेष ! – पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना आदेश !;भाजप नेत्या नवनीत राणा यांचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना प्रत्युत्तर !

पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना आदेश !

मुंबई – अजित पवार यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन ते भाजपच्या महायुतीत सामील झाले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवारांविरोधात पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अजित पवारांना ३६ घंट्यांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या ३६ घंट्यांत अजित पवार यांना पक्षचिन्हाविषयी स्पष्टीकरण देणारी सूचना वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करावी लागणार आहे.


भाजप नेत्या नवनीत राणा यांचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना प्रत्युत्तर !

अमरावती – तुझ्या घड्याळात १५ मिनिटे बाकी आहेत; पण माझ्या घड्याळात केवळ १५ सेकंद बाकी आहेत, अशा शब्दांत माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी एम्.आय.एम्.चे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना चेतावणीवजा प्रत्युत्तर दिले. अकबरुद्दीन ओवैसी प्रचाराच्या पहिल्या भाषणात म्हटले होते, ‘‘भाषणाची वेळ १० वाजताची वेळ आहे. अजून १५ मिनिटे उरली आहेत. संयम ठेवा. ना मी त्यांचा पिच्छा सोडणार ना ते माझा सोडणार. चल रही है मगर क्या गूंज है ।’’


काँग्रेसने आत्मविश्वास गमावला !

खासदार अशोक चव्हाण यांची टीका

नांदेड – काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे. महविकास आघाडीच्या जाहिरातीत प्रकाशकाचे नाव दिसत नाही, यावर निवडणूक आयोगाने कारवाई करणे आवश्यक आहे, भाजप या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करणार आहे. जाहिरातीत इतर राज्याचा मुख्यमंत्री दिसतो, हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.


दिव्यांग उमेदवाराने निवडणूक अधिकार्‍याची गाडी पेटवली !

पिंपरी-चिंचवड – येथील महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात पार्क केलेल्या चिंचवड निवडणूक निर्णय अधिकार्‍याची चारचाकी गाडी दिव्यांग व्यक्तीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अपक्ष अंध उमेदवार विनायक सोपान ओव्हाळ आणि त्यांचा साथीदार नागेश गुलाबराव काळे यांनी हा प्रकार केला. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या मागण्यांसाठी असा प्रकार केल्याचे पोलीस अन्वेषणातून लक्षात आले.


राहुल गांधींच्या हातातील राज्यघटनेचे पुस्तक कोरे !

नागपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूर येथील संविधान सन्मान संमेलनात उपस्थित होते. त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे लाल रंगाचे राज्यघटनेचे पुस्तक होते; मात्र हे पुस्तक आतून कोरेच असल्याचा आरोप भाजपने एका व्हिडिओद्वारे केला आहे.