कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे सरकारी भूमीवर बांधण्यात आली मशीद !

तक्रार करणार्‍या हिंदु व्यक्तीला दाऊद इब्राहिमच्या नावाने ठार मारण्याची धमकी

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथील गढिया चिंतामणी गावामध्ये सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या मशीद आणि ईदगाह (नमाजपठणासाठीची मोकळी जागा) बांधल्याचे प्रकरण समोर आले आहे. या विरोधात तक्रार करणार्‍या हिंदूला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नावाने धमकावण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला ही मशीद  बांधण्यात आली आहे. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार असतांना ही बांधकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी माजी गावप्रमुख इस्लाम अन्सारी यांच्या भूमिकेवरही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.

गावातील रवींद्र शाही यांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या धार्मिक स्थळांमुळे नागरिकांना ये-जा करतांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शाही यांच्यासह इतर अनेक ग्रामस्थांनी केला आहे. रवींद्र शाही यांच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून त्यांनी या बेकायदेशीर बांधकामांविषयी तक्रार केली, तेव्हापासून त्यांना त्यांच्या कुटुंबासह जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दाऊद इब्राहिमच्या नावाने या धमक्या दिल्या जात आहेत. सामाजिक माध्यमांतून ही धमकी देण्यात आली आहे.

‘सनातन सेना’ संघटनेकडून हनुमान चालिसाच्या पठणाची घोषणा !

बेकायदेशीर मशीद आणि ईदगाह तात्काळ पाडण्याची मागणी कुशीनगरच्या ‘सनातन सेना’ या हिंदु संघटनेने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन केली आहे. ‘प्रशासनाने बेकायदा बांधकाम लवकर पाडले नाही, तर त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल’, असे संघटनेचे प्रमुख अर्जुन किशोर यांनी सांगितले. या बेकायदा बांधकामावरून इस्लाम अन्सारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सनातन सेनेने लावून धरली आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशामध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! सरकारने तात्काळ कारवाई करून बेकायदेशीर बांधकाम पाडत हिंदु तक्रारदाराला सुरक्षा पुरवली पाहिजे !