बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचराचे प्रकरण
मुंबई – बदलापूर येथील शाळेत २ बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या घटनेची चौकशी आणि गुन्हा नोंद करण्यात कुचराई करणार्या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकार्यांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली.
या प्रकरणी एका पोलीस अधिकार्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी या वेळी दिली. त्या वेळी न्यायालयाने तो अहवाल ६ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात शिफारशी सुचवण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा अहवालही न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.
अल्पवयीन मुलींच्या कल्याणासाठी सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचीही माहिती महाधिवक्त्यांनी न्यायालयाला दिली. तसेच राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेंतर्गत भरपाईची रक्कमही वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. राज्य सरकारने प्रकरणाच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) स्थापन केले आहे. पोलिसांच्या चकमकीत आरोपी अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शाळेच्या २ विश्वस्तांनाही पोलिसांनी अटक केली.