प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : किं ब्राह्मणांना देवत्वम् ?
अर्थ : ब्राह्मणाच्या ठिकाणी देवपणा कोणता ?
उत्तर : स्वाध्यायः ।
अर्थ : स्वाध्याय करणे, हे ब्राह्मणाच्या ठिकाणचे देवत्व आहे.
संस्कृतीचे संरक्षण करणे आणि त्या दृष्टीने समाजाला मार्गदर्शन करणे, हे ब्राह्मणाचे परमकर्तव्य आहे. त्यासाठी त्याने सतत स्वतःचे ज्ञान वाढवत राहिले पाहिजे. निरनिराळ्या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. काही महत्त्वाच्या विषयांचे सखोल अध्ययन केले पाहिजे. संस्कृतीवर होणार्या आघाताचा प्रतिकार ज्ञानाने परिष्कृत झालेल्या बुद्धीच्या बळावर त्याला करता आला पाहिजे. त्याने विद्वानांकडून अनुभवाचे ज्ञान संग्रहित केले पाहिजे. वरचेवर प्रवास करून समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले पाहिजे. समाजापुढील निरनिराळे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. बिकटप्रसंगी काय करावे आणि कसे करावे ? असा प्रश्न उपस्थित झाला, तर योग्य तो विचारविनिमय करून त्याला प्रश्नांची सोडवणूक होईल, असा उपाय सुचवता आला पाहिजे. हे सर्व साधण्यासाठी त्याने स्वतःचे ज्ञान अभ्यासपूर्वक वर्धिष्णु आणि तेजस्वी राखले पाहिजे.
असे असले, तरच ब्राह्मणांना ‘भूदेव’ म्हणणे यथार्थ होईल. उपनिषदांनी यासाठीच ‘अनेक प्रपंच उपयोगी गोष्टींचा उल्लेख करून त्यांच्या योग्य आकलनासाठी आणि उपदेशासाठी स्वाध्याय-प्रवचनांचा अवलंब करावा’, असे कटाक्षाने सांगितले आहे.
वैदिक संस्कृती एकेकाळी सर्व जगात पसरलेली होती; पण भारतातून त्या संस्कृतीचे संरक्षण करणारे ब्राह्मण उपलब्ध न झाल्याने ‘शक, हूण, यवन आणि खस इत्यादी लोक मूळचे क्षत्रिय असून म्लेंच्छ झाले’, असे मनूने म्हटले आहे. ‘विद्वान आणि ज्ञानी ब्राह्मणाला देव का म्हणावे’, ते यावरून लक्षात येईल.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)