सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) सत्संगात मला पुष्कळ काही शिकायला मिळाले. या सत्संगात साधकांनी विचारलेले प्रश्न आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे पुढे दिलेली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना देवाशी बोलायला सांगणे

साधक : मला साधक, तसेच घरातील व्यक्ती यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कुणाशी बोलता आले नाही, तरी देवाशी बोलता येते. त्यामुळे देवाशी तरी बोला !

साधक : मी अगदी मोजके बोलतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मायेतील बोलणे मोजके झाले, तरी चालेल; पण देवाशी तरी सर्व बोलावे !

श्री. प्रणव मणेरीकर

२. साधकाने ‘तुमच्यामुळे माझे त्रास दूर झाले’, असे सांगितल्यावर ‘त्रास दूर होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केल्याचे हे फळ आहे,’ असे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगणे 

साधक : गुरुदेव, आपल्या कृपेमुळे माझ्या जीवनातील त्रास दूर झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : माझ्या कृपेमुळे काही होत नाही, तर तुम्ही तळमळीने प्रयत्न केल्याचे हे फळ आहे.

(‘यावरून ‘साधकात तळमळ असणे किती महत्त्वाचे आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि सर्व करून ‘स्वतः नामानिराळे रहाणे अन् सतत इतरांना श्रेय देणे’, या गुरुदेवांमधील गुणाचेही दर्शन झाले !’ – श्री. प्रणव मणेरीकर)

३. सर्व काही ईश्वरेच्छेने घडत असल्याने ‘मुलाने साधना करावी’, ही स्वेच्छाही नको ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधक : पूर्वी साधना करणारा माझा मुलगा आता साधना करत नाही. त्याला आश्रमात येण्याची इच्छा होत नाही. यामुळे मला मानसिक त्रास होतो. आपण मला हा त्रास सहन करायची शक्ती द्यावी.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘प्रत्येकाचे प्रारब्ध आणि तळमळ किती आहे’, यावर त्याची साधना अवलंबून असते. ‘मला त्रास सहन करायला शक्ती द्यावी’, असा विचार करायचा नाही; कारण हीसुद्धा स्वेच्छा झाली. स्वेच्छा नको. सर्व ईश्वरेच्छेने घडते. स्वेच्छेने वागून आपली शक्ती व्यर्थ घालवायला नको. त्याऐवजी स्वतःची साधना आणि शक्ती वाढवा !

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘अंतमनाची साधना कशी वाढवावी ?’, याविषयी सांगणे 

साधक : अंतर्मनाची साधना कशी वाढवावी ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘सेवेचा अखंड विचार करणे आणि सेवेचे विचार नसतांना नामजप करणे’, असे केल्याने अंतर्मनाची साधना चालू रहाते.

५. ‘साधना करून ईश्वराला प्रसन्न करणे’, हा व्यष्टी साधनेचा पाया असल्याने साधकांनो, व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष करू नका ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर

साधक : मी समष्टी सेवा करतो; परंतु व्यष्टी साधना करत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना महत्त्वाची आहे; परंतु समष्टी साधना चांगली होण्यासाठी व्यष्टी साधना करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ करण्याला प्राधान्य द्यावे. व्यष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचना द्यावी. स्वयंसूचना दिल्याने अंतर्मनावर व्यष्टी साधनेचे महत्त्व बिंबते. संत व्यष्टी साधना करूनच साधनेत पुढे गेले आहेत. ‘साधना करून ईश्वराला प्रसन्न करणे’, हा व्यष्टी साधनेचा पाया आहे. व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होत असल्यास त्यासाठी स्वतःला शिक्षा करावी. ‘समष्टी साधना करतो; पण प्रगती झाली नाही’, असे व्हायला नको.

(क्रमश:)

– श्री. प्रणव अरुण मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र, मथुरा. (१४.९.२०२४)