परळी वैजनाथ मंदिराच्या शिखराजवळील भिंत पाडून शिवलिंग दर्शनासाठी खुले !

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली तोडफोड !

बीड : १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५वे ज्योतिर्लिंग असलेल्या बीड जिल्ह्यात असलेल्या परळी येथील प्रभु वैजनाथ मंदिराच्या शिखराजवळील भिंत पाडण्यात आली. मंदिराच्या शिखराच्या भागातील पायथ्याला एक शिवलिंग होते. जुन्या काळापासून या ठिकाणी परळीकर दर्शनाला जात. मात्र ‘वैजनाथ देवस्थान ट्रस्ट’ने हे शिवलिंग काढून ही जागा बंद केल्याने माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली.

५ ते ७ लोक समवेत घेत देशमुख यांनी परळी वैजनाथ मंदिराच्या शिखराजवळील भिंत पाडली आणि तेथील महादेवाचे दर्शन शिवभक्तांसाठी खुले केले. तोडफोड करतांनाचे व्हिडिओ देशमुख यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारितही केले.

देशमुख यांनी वैद्यनाथ मंदिराच्या शिखराजवळ भिंत तोडली आणि तेथील महादेवाचे दर्शन शिवभक्तांसाठी खुले केले

देशमुख यांनी सांगितले की, ‘वैजनाथ देवल कमिटी’च्या विश्वस्तांना अनेक वेळा निवेदन दिले; परंतु काहीही दाद न दिल्यामुळे मी आणि माझ्या सहकारी शिवभक्तांनी मंदिरात असणार्‍या कळसातील महादेवाचे दर्शन सर्वांसाठी खुले केले. आमच्या भावनेचा आणि श्रद्धेचा हा विषय आहे.

वैजनाथ देवस्थान ट्रस्टने या प्रकरणी परळी शहर पोलिसात दीपक देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा, असा तक्रार अर्ज केला आहे.