पनवेल, ११ ऑक्टोबर (वार्ता.) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने देवद गाव येथे ११ ऑक्टोबर या दिवशी श्री दुर्गामाता दौड पार पडली. या वेळी धर्मध्वजाचे पूजन आश्रमातील साधक श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांनी केले, तसेच सनातन संस्थेच्या साधिकांनी औक्षण केले. श्रीफळ वाढवल्यावर शंखध्वनी होऊन दौड मार्गस्थ झाली.
देवद येथील सनातन आश्रम येथून सकाळी साडेसहा वाजता दौडीस प्रारंभ होऊन गावातील गावदेवी मंदिर, विसपुते महाविद्यालय, पुष्पनारायण सोसायटी अशी फिरून पुन्हा सनातन आश्रमात येऊन दौडीची सांगता झाली. दौडीमध्ये ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्यात आले. स्थानिक श्री गावदेवी मंदिरात दौड आल्यावर तेथे सुवासिनींनी धर्मध्वजाचे पूजन केले आणि मंदिरात दौडीत सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून आरती करण्यात आली. दिंडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, महिला, मुले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.