पणजी, ३ ऑक्टोबर (पत्रक) – झेवियरच्या शवाची डी.एन्. ए. चाचणी करावी, अशी मागणी केल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रारी प्रविष्ट (दाखल) झाल्यानंतर हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी पोलीस अधीक्षक उत्तर गोवा आणि जुने गोवे पोलीस ठाणे येथे प्रत्यत्तरादाखल स्वतःची व्यक्तीगत अपकीर्ती झाल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे.
घटनेच्या चौकटीतच बसणार्या अधिकारात ही मागणी केलेली असतांना माझी व्यक्तिगत अपकीर्ती आणि चारित्र्यहनन एका विशिष्ट गटाने केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आलेले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘डि.एन्.ए. चाचणीची मागणी जुनीच आहे. त्याखेरीज ‘सेंट’ (संत) म्हणून चर्चची मान्यता मिळालेल्या व्यक्तीच्या अवशेषांची अशी चाचणी करून देण्याची चर्चची परंपरा आहे. ४०० वर्षांपूर्वी ठार मारली गेलेली जॉर्जियाची राणी केटेव्हान हिच्या अवशेषांचा शोध जुने गोवे येथेच ऑगस्टीन टॉवर भूमीत शासन आणि चर्च यांच्या रितसर अनुमतीने उत्खनन करून घेतला गेला. चर्चच्या संमतीने त्या राणीच्या अवशेषांची डि.एन्.ए. चाचणी करून ते अवशेष राणीचेच होते, हे सिद्ध झाल्यावर १० जुलै २०२१ या दिवशी भारत सरकारने सन्मानपूर्वक ते शव जॉर्जियाच्या सरकारच्या स्वाधीन केले. या राणीला संतपद देण्यात आलेले होते. एका संतांना एक न्याय आणि दुसर्याच्या संदर्भात मात्र जातीय सलोखा कसा अन् का बिघडतो ? संशयाचा कायमचा सोक्षमोक्ष लावावा, असे चर्चला वाटू नये का ? अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने एकदा हे शव झेवियरचे आहे, हे सिद्ध व्हायला नको का? एवढे खवळण्याचे कारण काय ? असा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून मागणी करणे गैर ठरत नाही.’’