पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड पीपल (HOLI) म्हणजेच ‘होली’ या संघटनेकडून आझाद
भवन, पर्वरी येथे ७ दिवसांच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ३ ऑक्टोबरला प्रारंभ झाला. ९ ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम असेल. हे संगीतमय कथावाचन हिंदी भाषेतून असणार आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे. ३ ऑक्टोबरला श्री भागवत माहात्म्य, शुकदेव जन्म आणि परिक्षित जन्म यांवर निरूपण झाले. ४ ऑक्टोबरला कपिल देवहूति संवाद आणि ध्रुव चरित्र यांवर निरूपण करण्यात येणार आहे. प्रतिदिन कथा झाल्यावर महाप्रसाद असणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला हवन आणि प्रसाद वितरण कार्यक्रम होणार आहे.
३ ऑक्टोबर या दिवशी प्रारंभी येथील हनुमान मंदिरात कलश पूजा करण्यात आली. यजमान श्री. सूरज नाईक आणि सौ. शर्मिला सूरज नाईक हे होते. या वेळी आचार्य श्री विपिन कृष्णाजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. ‘होली’ संघटनेचे अध्यक्ष श्री. के.के. चतुर्वेदी आणि अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रा हनुमान मंदिरापासून प्रारंभ होऊन गृहनिर्माण वसाहत मार्गे शेवटी आझाद भवन येथे पोचल्यावर तिची सांगता झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीकृष्णमूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. आचार्य श्री विपिन कृष्णाजी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर आचार्यांनी भागवत कथेचा पहिला भाग घेतला. सभागृह स्थळी सनातनचा ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला आहे.