ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या सर्वसामान्य आजारांत होतो वापर !
नवी देहली – समाजात रूढ असलेल्या विविध आजारांवरील तब्बल ५० हून अधिक औषधे सरकारद्वारा संचालित ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’कडून घेतलेल्या गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरली आहेत. यांमध्ये अगदी ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या सर्वसामान्य आजारांसाठी वापरण्यात येणार्या औषधांचाही समावेश आहे. संस्थेने हा अहवाल ऑगस्ट २०२४ मध्ये प्रसारित केला होता. त्याची माहिती प्रसारमाध्यमांत आता आली आहे.
या ५३ औषधांमध्ये विविध जीवनसत्त्वे, कॅल्शियम डी ३ सप्लिमेंट्स, मुलांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग, ‘ऍसिड रिप्लक्स’ आणि पोटातील संसर्ग यांसाठी लागणार्या औषधांचाही समावेश आहे. या औषधांना एन्.एस्.क्यू. (नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी, म्हणजेच निर्धारित मानांकनास अनुरूप नाही) ठरवण्यात आले आहे.
अनुरूप नसलेली ही औषधे आणि त्यांचे उत्पादन करणारी ही आहेत आस्थापने !
१. पॅरासिटामॉल (आयपी 500 एम्.जी.) : सौम्य ताप आणि वेदनाशामक म्हणून या औषधाचा सर्रास वापर केला जातो.
२. ग्लिमेपिराइड : मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे हे सर्वसामान्य औषध ! ‘अल्केम हेल्थ’ याचे उत्पादन करते.
३. टेल्मीसार्टन (Telmisartan 40 एम्.जी.) : उच्च रक्तदाबावरील हे औषध ‘ग्लेनमार्क’ हे प्रथितयश आस्थापन बनवते.
४. पॅन डी : पित्तावर गुणकारी असलेले हे औषध असून ‘अल्केम हेल्थ सायन्स’ नावाचे आस्थापन याचे उत्पादन करते.
५. ‘शेलकॅल सी’ आणि ‘डी 3 कॅल्शियम पूरक’ : ‘प्यूर अँड क्यूअर हेल्थकेअर’ आस्थापन हे औषध बनवते.
६. Clavam 625 : हे एक प्रतिजैविक औषध आहे.
७. Sepodem XP 50 Dry Suspension : लहान मुलांमध्ये निर्माण होणार्या बॅक्टेरियावर (रोगाच्या सूक्ष्म जंतूंवर) उपचार म्हणून या औषधाचा वापर केला जातो. ‘हेटेरो’ आस्थापन हे औषध बनवते.
८. Ursocol 300 : ‘सन फार्मा’ हे प्रसिद्ध आस्थापन हे औषध बनवते.
९. Defcort 6 : संधिवाताच्या उपचारात दिले जाणारे ‘मॅक्लिओड्स फार्मा’चे हे औषधही गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले आहे.
संपादकीय भूमिकायांपैकी अनेक औषधी आस्थापनांवर जनतेचा पैसा लुटण्याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे. यांपैकी विदेशी आस्थापनांवर बंदी का घालू नये आणि संबंधित भारतीय औषधी आस्थापनांची अनुज्ञप्ती रहित का केली जाऊ नये, हा जनतेचा प्रश्न आहे ! |