सातारा, ९ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, वाई आणि महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. राज्यशासनाच्या गृह विभागाकडून ही मान्यता प्राप्त झाली असून लवकरच बसस्थानकांच्या इमारतींच्या पुनर्बांधणी कामास प्रारंभ होणार आहे.
राज्यशासनाने याची नोंद घेत सातारा बस मध्यवर्ती स्थानकासाठी १४ कोटी ९९ लाख ९९ सहस्र रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. यामध्ये फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, पास कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह, महिला विश्रांतीगृह आदी विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. याचसमवेत वाई मध्यवर्ती बसस्थानकाची ही पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी राज्यशासनाने १२ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ९० सहस्र रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.