मिरज (जिल्हा सांगली), ७ सप्टेंबर (वार्ता.) – मिरज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत कमानी, मंडप, व्यासपीठ उभारणी करतांना सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे, असा आदेश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महानगरपालिका प्रशासनास दिला आहे. मिरज शहरातील गणेशोत्सव हा राज्यात सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटक येथील लाखो भाविक मिरज येथे येत असतात. येथील गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याचे भव्यदिव्य, आकर्षक अशा स्वागतकमानी हे वैशिष्ट्य असते. मंडळाचे कार्यकर्ते श्रद्धेने १० दिवस सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आकर्षक आणि भव्य अशा गणेशमूर्ती हेही मिरज शहरातील वैशिष्ट्य आहे.