मुंबई – १ सप्टेंबर या दिवशी लालबागमध्ये एका बसने ९ जणांना धडक दिली. त्यांपैकी ५ जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, तर तिघांवर अद्याप उपचार चालू आहेत. या अपघातात घायाळ झालेल्या एका तरुणीचा उपचारांच्या काळात मृत्यू झाला आहे. बसमधील दत्ता शिंदे या मद्यधुंद प्रवाशामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
बसमधील एका मद्यपीचे चालकासमवेत भांडण झाले. त्याने हमरीतुमरीवर येऊन चालकाच्या खांद्यावर हात टाकत बसच्या स्टेअरिंगचा ताबा मिळवण्याचा आणि चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मद्यपीने स्टेअरिंग वळवले आणि बसने काही वाहने आणि पादचारी यांना धडक दिली. (चालकाने सतर्कता दाखवून वेळीच गाडी थांबवणे अपेक्षित होते. – संपादक) बस क्रमांक ६६ (दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथून सुटणारी इलेक्ट्रिक बस) शीववरून राणी लक्ष्मीबाई चौक या बस थांब्याच्या दिशेने जात होती. तेव्हाच गणेश चित्रपट गृहाजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी मद्यपीला कह्यात घेतले आहे. लालबाग येथे गणेशोत्सवामुळे गर्दी होती. या अपघाताने उत्सवाला गालबोट लागले आहे. मरण पावलेल्या तरुणीचे नाव नुपूर मणियार (वय २८ वर्षे) आहे. ती कुटुंबातील कर्ती मुलगी होती. तिचा विवाह ठरला होता.