पाच्छापूर (भिवंडी) येथील तरुणांकडून अल्पवयीन मुलाची भ्रमणभाषसाठी हत्या !

भिवंडी (ठाणे) – पाच्छापूर गावानजीक असलेल्या हर्‍याचापाडा परिसरात १३ वर्षांच्या मुलाने बाजारात जाण्यासाठी रस्त्याने जात असतांना एका दुचाकी चालकाला हात दाखवत बाजारापर्यंत सोडण्याची विनंती केली. संबंधितांनी त्याला दुचाकीवर बसवून त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्याच्या जवळील भ्रमणभाष आणि १०० रुपये रोख हिसकावून त्याची गळा आवळून हत्या केली.

हा मुलगा शहापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत ९ वीत होता. काही महिन्यापूर्वीच त्याच्या आईने त्याला १५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष घेऊन दिला होता. रक्षाबंधनासाठी तो आश्रमशाळेतून हर्‍याचापाडा येथे त्याच्या काकांकडे आला होता. १८ ऑगस्ट या दिवशी बाजारात राखी आणि काही साहित्य खरेदीसाठी त्याच्या काकांनी १०० रुपये दिले होते. मुलगा घरी परत न आल्याने काकाला वाटले तो आश्रमशाळेत परत गेला असावा. काकांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद केल्यावर पोलिसांना सीसीटीव्ही चित्रणात गाडीवरून जातांना हा मुलगा दिसला.

संपादकीय भूमिका

भ्रमणभाषच्या आकर्षणातून अल्पवयीन युवकाची हत्या करण्यापर्यंत युवकांची मजल जाणे, हे युवकांच्या अधःपतित मानसिकेचे द्योतक आहे. अशी पिढी निर्माण होत असलेला देश खर्‍या अर्थाने विकसित कधी होणार ?