छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी
पुणे – मालवणमधील ‘राजकोटा’वरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेप्रकरणी कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने अधिवक्ता असीम सरोदे यांनी नोटीस जारी केली आहे. ही नोटीस कंत्राटदार, शिल्पकार, बांधकाम सल्लागार, नौदल विभाग, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह राज्याच्या मुख्य सचिवांना जारी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मिती आणि उभारणी प्रक्रियेतील त्रुटींवर या नोटीसीद्वारे बोट ठेवण्यात आले आहे. पुतळा उभारणीचे आदेश भारतीय नौदल विभागाकडून शिल्पकार आपटे यांच्या ‘मेसर्स आर्टिस्ट्री’ या आस्थापनाला दिले. त्यांनी पुतळा उभारणीसाठी आवश्यक वैज्ञानिक निकष पाळले नाहीत. भौगोलिक परिस्थितीचाही अभ्यास केला नाही, असे सूत्र अधिवक्ता सरोदे यांनी उपस्थित केले आहे.
महाराष्ट्र शासन, नौदल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागही यासाठी तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी नोटिसीद्वारे केली आहे. या न्यायालयीन नोटिसीला ७ दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास न्यायालयामध्ये दाद मागावी लागेल, असेही नोटिसीमध्ये नमूद केले आहे.