अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील खासदार कंगना राणावत या नेहमी ‘विवादास्पद विधाने करत असतात’, अशी टीका त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून होत असते. कुठलीही विधाने विवादास्पद केव्हा वाटतात ? जेव्हा अनेकांना ती चुकीची वाटतात किंवा आवडत नाहीत. कंगना यांनी त्यांची हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ भूमिका कधीच लपवली नाही आणि राष्ट्रावरील प्रश्नांविषयी त्यांनी अनेकदा सडेतोड अन् परखड भूमिका घेतली. ही विधाने समाजवादी माध्यमे आणि हिंदुविरोधक यांना टोचत असल्यामुळेच त्यांची विधाने ‘विवादास्पद’ झाली. कंगना यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ‘कृषी आंदोलनातही बांगलादेशप्रमाणे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र होते. तिथे बलात्कार झाले आणि हत्या झाल्या.’ त्यांच्या या विधानावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर आगपाखड केली. भाजपनेही वाद वाढू नये, म्हणून त्याचा कंगना यांच्या विधानांशी संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. असो. हे राजकारण आहे; परंतु ‘राष्ट्रविरोधी शक्तींच्या संदर्भात सर्वांनी एक होऊन लढा चालू ठेवला पाहिजे’, हे कुणीही नाकारणार नाही. कृषी आंदोलनाच्या काळात बलात्कार झाल्याची आणि आंदोलनाच्या काळात व्यक्ती मृत झाल्याची वृत्ते आली होती. जरी बांगलादेशाएवढा उद्रेक झाला नसला, तरी कृषी आंदोलनामागे आणि बांगलादेश आंदोलनामागे आंतरराष्ट्रीय भारतविरोधी शक्ती कार्यरत आहेत, हे साम्यही कुणीही नाकारू शकणार नाही.
स्वार्थी आणि विरोधीशक्ती प्रेरित कृषी आंदोलन !
देहलीच्या सीमेवर झालेल्या कृषी आंदोलनाने देशाला आणि सरकारला त्रास झाला होता, हे कोण विसरेल ? भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ‘हे आंदोलन १३ महिने शांततेत झाले’, असे विधान केले आहे. देशाला हितकारक असलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन केले. जे आंदोलनकर्ते १३ मास आणि अजूनही देशाच्या राजधानीच्या सीमेवर आहेत, त्यांना सरकार १३ मास रोखू शकले नाही कि त्यांचे समाधानही करू शकले नाही. जे काही चालू होते, ते अयोग्य होते, हे सांगायला वेगळा आरसा कुणाला हवा आहे ? आंदोलनासाठी प्रचंड प्रमाणात विदेशातून निधी आला. या निधीतूनच त्यांचे खाणे-पिणे चाले, त्यात कित्येक वेळा देशविरोधी घोषणा दिल्या जात होत्या, हे सारे देशहितकारक होते का ? बरं हे आंदोलन कृषीहितकारक तरी होते का ? शेतकर्यांना शेतीची कामे सोडून रस्त्यावर अनेक मास उन्हात, थंडीत ताटकळत ठेवले, त्यांचे प्रातर्विधी, अंघोळ आदी गोष्टी त्यांनी कशा केल्या असतील ? कसे झोपले असतील ? यात सहभागी झालेले खरे शेतकरी किती होते ? असाही प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. लाल किल्ल्यावर जाऊन या संघटनेच्या म्होरक्याने त्यांचा झेंडा लावला. हे सारे आंदोलन कॅनडापुरस्कृत खलिस्तानवाद्यांच्या प्रेरणेने चालू होते, हे कुठेही लपून राहिलेले नाही. नाईलाजाने सरकारला कृषी कायदे तात्पुरते तरी रहित करून आंदोलकांना नामोहरम करावे लागले; परंतु त्यासाठी त्यांनी विकासाच्या आड येणारी मोठी किंमत मोजली, हे उघड आहे.
पंतप्रधानांच्या जिवावार उठलेले खलिस्तानवादी !
पंतप्रधान पंजाब दौर्यावर गेले असता त्यांच्या गाडीपासून काही अंतरावरील चौकात याच कृषी आंदोलकांनी रस्ते अडवले. पंतप्रधानांचा रस्ता अडवण्यासाठी तेथील पोलीस यंत्रणाही सहभागी होती, हे उघड झाले. देशाच्या पंतप्रधानांना अडवण्याचे एवढे मोठे त्यांचे धैर्य झाले. पंतप्रधानांना दौरा सोडून परत फिरावे लागले. पंतप्रधानांना अडवून त्यांच्यावर आक्रमण करण्याचे त्यांचे नियोजन असल्याची वृत्ते त्यानंतर मोठ्या प्रमाणात आली. या सर्व आंदोलकांना खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा होता. एवढेच नव्हे, तर पंतप्रधानांना ठार मारण्याचे त्यांचे नियोजन काही वर्षांपूर्वीच झाले होते.
नुकतेच कृषी आंदोलनाचे नेते टिकैत यांनी विधान केले, ‘‘बांगलादेशाप्रमाणे मोदी यांनाही आम्ही पायउतार करू.’’ यावरून त्यांचा देशविघातक रोख त्यांनी स्पष्टपणेच बोलून दाखवला. त्यांच्या या देशविरोधाचे आणखी कोणते वेगळे पुरावे कुणी द्यायला हवे ? त्यांना देशाचे पंतप्रधान किती खुपत आहेत आणि शेतकरी आंदोलन हे केवळ निमित्त आहे, हे वेगळे कशाला सांगायला हवे ?
कृषी आंदोलन हा ‘साम्यवादी इकोसिस्टीम’चा भाग !
मोदी सरकार लागू करत असलेले कृषी कायदे हे शेतकर्यांच्या हिताचे होते; शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील दलाल नष्ट होऊन त्याचा थेट लाभ शेतकर्यांना होणार होता; परंतु सरकार शेतकर्यांच्या ‘शेतमालाला योग्य हमीभाव देणार नाही’ आणि ‘सरकार मोठ्या आस्थापनांचे हित साधत आहे’, असा कांगावा करून हे आंदोलन उभारण्यात आले. शेतकर्यांची हानी होणार असती, तर संपूर्ण देशातील शेतकरी यात सहभागी झाले असते; परंतु तसे झाले नाही. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि काही प्रमाणात गुजरात येथील शेतकरी यात सहभागी झाले. शेतकरी संघटनेने केलेला हा कांगावा हा ‘साम्यवादी इकोसिस्टीम’चा (एकमेकांना पाठिंबा देणार्या देशविरोधी व्यवस्था) भाग आहे. विदेशातील कुठलाही संबंध नसलेल्या गायिकेने या आंदोलनाला पाठिंबा देणे, हाही या आंतरराष्ट्रीय साम्यवादी इकोसिस्टिमचा भाग असल्याचे लक्षात आले. देशात कुठल्याही छोट्या-मोठ्या गोष्टी प्रसिद्धीमाध्यमांनी वाढवायच्या, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर आंदोलने करून घ्यायची, त्यासाठी विदेशातून पैसा घ्यायचा, प्रसिद्ध व्यक्तींनी त्याविषयी सामाजिक माध्यमांतून विधाने करायची, ही सारी ‘इकोसिस्टीम’ उद्ध्वस्त करण्यासाठी आता राष्ट्रहितैषी विचारधारेने पुढे येणे आवश्यक आहे.
कंगना यांच्या वक्तव्यामुळे इकोसिस्टीमला तडा !
कृषी आंदोलनाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीला घेरून देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब करणे, मोदी सरकारला कोंडीत पकडणे, आता हे आंदोलन करणार्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांना सत्तेवरून हटवण्याचे, म्हणजेच पर्यायाने देशात अराजक माजवण्याचे वक्तव्य करणे, हे सारे काय आहे ? अशा प्रकारची आंदोलने झाली की, सर्व विरोधी पक्ष एक होऊन पंतप्रधानांच्या विरोधात एकत्र येतात आणि आंदोलनाला पाठिंबा देतात. तेही एक प्रकारे या ‘इकोसिस्टीम’चा भाग बनतात. या आंदोलनाच्या संदर्भात खासदार कंगना यांनी वक्तव्य केल्याने या देशविघातक ‘इकोसिस्टीम’ला एका प्रकारे धक्का लागला आहे. आंदोलनाचा खोटेपणा आणि देशविरोधी कारवाया करण्याची छुपी गोष्ट कंगना यांनी एक प्रकारे उजागर केली, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. त्यामुळे कुणी कंगना यांना काहीही म्हणो, त्यांच्या बोलण्याने अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत, हेही तितकेच खरे !
कृषी आंदोलनाला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रहितैषी विचारधारेने पुढे येणे आवश्यक ! |