महिला अत्याचाराची शृंखला…
नाशिक येथील खासगी शिकवणीवर्गातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसमवेत अश्लील चाळे !
नाशिक – येथील ‘ज्ञानेश्वर कोचिंग क्लासेस’ या खासगी शिकवणीवर्गाचा मालक आणि शिक्षक कृष्णा दहिभाते याने विद्यार्थिनीसमवेत अंगलट करून अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. ५ वीत शिकणार्या या विद्यार्थिनीने हा प्रकार घरी सांगितल्यावर पालकांच्या तक्रारीनुसार त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी आली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने सर्व घटना सांगितली. या शिक्षकाने ‘घरी काही सांगितल्यास तुझी तक्रार करीन’, अशी धमकीही दिली होती. सिंदखेड राजा तालुक्यातही एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे वृत्त आहे.
चंद्रपूर येथे बस आगारातील शौचालयात सामूहिक अत्याचार !
चंद्रपूर – राज्य परिवहन मंडळाच्या शौचालयात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
ठाणे येथे अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न !
असुरक्षित ठाणे शहर !
गुन्हा नोंद
ठाणे, २४ ऑगस्ट (वार्ता.) – २३ ऑगस्टला वर्तकनगर येथे अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर वर्तकनगर भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वर्तकनगर येथे एम्.एम्.आर्.डी.ए.ची रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये अडीच वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासमवेत रहाते. २३ ऑगस्टला सकाळी ती घराजवळील मोकळ्या जागेत खेळत असतांना एक २५ ते ३० वर्षे वयोगटातील व्यक्ती त्या ठिकाणी आली. मुलीला उचलून ती तेथून निघू लागली. त्याच वेळी मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला. मुलीच्या आईने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्या व्यक्तीने मुलीला तिच्या आईच्या अंगावर ढकलले आणि तेथून पळ काढला.
नालासोपारा (जिल्हा ठाणे) १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
स्त्रियांवरील अत्याचार थांबण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
नालासोपारा (जिल्हा ठाणे) – येथे १७ वर्षांच्या मुलीवर २ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी नालासोपारा येथे जायची. केवळ ४-५ दिवसांच्या ओळखीनंतर मैत्रिणीच्या घराशेजारच्या स्टुडिओत काम करणार्या २५ वर्षांच्या सोनू या तरुणाने तिला भेटण्यासाठी रेल्वेस्थानकात बोलावले. त्या वेळी त्याचा मित्रही समवेत होता. ते दोघे तिला फिरण्याच्या बहाण्याने रिक्शातून नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
हिंगणा तामसवाडी (जिल्हा अकोला) येथील १० वर्षीय मुलीवर बलात्कार
अकोला – हिंगणा तामसवाडी (जिल्हा अकोला) येथील १० वर्षीय मुलीवर बलात्कार अकोटफैल पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील एक कुटुंब मुलीला वल्लभनगर येथील आपल्या नातेवाइकांकडे ठेवून बाहेर गेले. तेव्हा दूरचा नातेवाईक यश गवई याने तिच्यावर बळजोरीने अत्याचार केला.
डोंबिवली येथे २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या नराधामाला नाशिक येथून अटक !
आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास अशी विकृत कृत्ये करण्याचे कुणी धाडस करणार नाही !
ठाणे, २४ ऑगस्ट (वार्ता.) – डोंबिवली पूर्व येथील सागाव भागातील २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या प्रवीण पाटील या नराधमाला मानपाडा पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे. मागील १४ दिवसांपासून आरोपी पसार होता. आरोपीला कल्याण न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने पाटील याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी २ अल्पवयीन मुली घराच्या परिसरात खेळत होत्या. त्यांना पाहून आरोपी प्रवीण पाटील विशिष्ट हावभाव करून अश्लील चाळे करत होता. प्रवीण करत असलेले कृत्य पाहून दोन्ही मुली घाबरल्या. त्यांनी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिक तेथे जमा झाल्याने मारहाण होण्याच्या भीतीने प्रवीण तेथून पळून गेला. पीडित मुलींनी घरात हा प्रकार सांगितला. मुलींच्या पालकांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली होती.
मागील काही दिवसांपासून ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात विनयभंग, बलात्कार यांचे प्रकार वाढल्याने शासनाने या भागांत कर्तव्यकठोर पोलीस अधिकार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.