पिंपरी-चिंचवड महापालिकेचे व्यवहार होणार कागदविरहित !

पिंपरी – स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर महापालिकेचे व्यवहार कागदविरहित होणार आहेत. यासाठी प्रशासनाने सक्षम ई.आर्.पी. (एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग) प्रणाली अवलंबली आहे. यामध्ये विवाह नोंदणी, प्रेक्षागृह, नाट्यगृह नोंदणी, ग्रंथालय व्यवस्थापन, माहिती अधिकार, पशूवैद्यकीय व्यवस्थापन इत्यादींसह विविध विभागांचा समावेश आहे. ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड’च्या वतीने जी.आय्.एस्. सक्षम ई.आर्.पी. प्रकल्पाची कार्यवाही केली जात आहे. या अंतर्गत महापालिकेच्या ३५ विभागांचे दैनंदिन कामकाज कागदविरहित केले जाणार आहे. यासाठी महापालिकेचे सर्व विभाग ऑनलाईन जोडले आहेत. या प्रणालीमुळे नागरी सेवा सुविधा आणि सर्व कागदपत्रांचे कामकाज ऑनलाईन होईल. अभिलेख, कामगार कल्याण कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र, नगर सचिव या विभागांचेही कामकाज प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन स्वरूपात चालू केले जाणार आहे. महापालिकेच्या प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने ही प्रणाली चालू केली आहे. या प्रणालीमुळे कामकाजाला गती मिळेल, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.