औषधोपचार करूनही बरे न होणारे त्रास नामजपादी उपायांमुळे उणावणे

सौ. सविता तिवारी

१. औषधोपचार करूनही शारीरिक त्रास दूर न होणे, त्यानंतर नामजपाचे उपाय केल्यावर त्रास पूर्णपणे थांबणे

‘जुलै आणि ऑगस्ट २०२३ या कालावधीत मला सर्दी, खोकला आणि कफ यांचा पुष्कळ त्रास होत होता. विविध औषधोपचार करूनही त्रास वाढत जाऊन मला दम्यासारखा त्रास होऊ लागला. सतत खोकल्याने मला झोप न येणे, अस्वस्थता, अंगदुखी असेही त्रास होऊ लागले. तज्ञ आधुनिक वैद्यांचे उपचार, ‘ॲन्टिबायोटिक’ औषधे घेऊनही त्रास उणावत नव्हता. क्ष-किरण (एक्स रे), तसेच रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. तेव्हा हा आध्यात्मिक त्रास असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी श्रीमती मीरा करी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांनी मला प्राणशक्तीवहन पद्धतीने ‘महाशून्य’ हा नामजप, एक हात अनाहतचक्रावर आणि एक हात आज्ञाचक्रावर असे न्यासासहित ३ दिवस ३ घंटे करण्यास सांगितला. आरंभी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ३ – ४ दिवस मी केवळ एक घंटा बसून नामजप करू शकले. नंतर ३ दिवस मी ३ घंटे न्यासासहित बसून नामजप केला. त्यानंतर माझा त्रास पूर्णपणे थांबला.

२. औषधोपचार करूनही गुडघेदुखी न थांबणे; परंतु नामजपाचे उपाय केल्यावर गुडघा दुखण्याचे प्रमाण ९० टक्के उणावणे

ऑक्टोबर २०२३ मध्ये मी नातेवाइकांकडे जातांना चारचाकी गाडीत बसतांना माझा डावा गुडघा दुखावला. त्यानंतर गुडघा पुष्कळ सुजल्याने मला पुष्कळ वेदना होत होत्या. औषधोपचार करूनही त्यात पालट होत नव्हता. क्ष-किरण चाचणी केल्यावर त्यात विशेष त्रास नसून ‘केवळ कॅल्शियमचे प्रमाण अल्प आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. तसेच मला २ व्यायाम प्रकार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रयत्न करूनही त्रास उणावत नव्हता. तेव्हा श्रीमती मीरा करी यांनी मला प्राणशक्तीवहन पद्धतीने ‘निर्गुण’ हा नामजप, एक हात डाव्या कानाच्यावर आणि एक हात अनाहतचक्रावर असे न्यासासहित ३ घंटे प्रतिदिन करण्यास सांगितला. आरंभी जप पूर्ण करणे मला काही अडचणींमुळे शक्य झाले नाही. नंतर ७ दिवस हा जप न्यासासहित केल्यावर माझा गुडघा दुखण्याचे प्रमाण ९० टक्के उणावले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच प्राणशक्तीवहन पद्धत समजली आणि मी नामजपाचे उपाय केल्यामुळे त्रासांतून बाहेर पडू शकले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. सविता तिवारी (वय ७२ वर्षे), संभाजीनगर (१७.११.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक