सोलापूर – ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या समाधीस वैशिष्ट्यपूर्ण सजावट साकारली जाते. या वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी फुलांची भव्यदिव्य सजावट करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्या श्रावण सोमवारी समाधीवर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष ‘मेघडंबरी’ साकारण्यात आली आहे.
या ठिकाणी सोलापूर शहर, तसेच जवळपासच्या जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीकरिता विविध रंगांची फुले वापरण्यात येतात. दर्शनाला आलेले भक्त सेवा म्हणून यात सहभागी होत असतात. ही सजावट साकारण्यासाठी १ दिवस आणि १ रात्र एवढा कालावधी लागतो. सुमारे १ सहस्र किलोहून अधिक फुले यासाठी वापरली जातात.