पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विवाह जुळवण्यापूर्वी पाहिली जाणारी काही तत्त्वे आणि भारतीय हिंदु समाजातच विवाहपरंपरा सहस्रो वर्षे टिकून आहेत’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ३२)
या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/821791.html
४. सप्तपदीत करावयाच्या प्रतिज्ञा !
पहिले वचन
तीर्थव्रतोद्यापनयज्ञदानं मया सह त्वं यदि कान्त कुर्याः ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद वाक्यं प्रथमं कुमारी ।। १ ।।
अर्थ : कन्या पहिले वचन देतांना म्हणाली, ‘‘स्वामी, जर (तेव्हा) तुम्ही माझ्यासह तीर्थाटन, व्रत, उद्यापन, यज्ञ, दान आदी शुभ कर्म कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
दुसरे वचन
हव्यप्रदानैरमरान्पितृँश्च कव्यप्रदानैर्यदि पूजयेथाः ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं द्वितीयम् ।। २ ।।
अर्थ : कन्या दुसरे वचन देतांना म्हणाली, ‘‘जर तुम्ही हव्य (यज्ञाच्या वेळी स्वाहाकारासह होम केलेले द्रव्य) अर्पण करून देवतांना आणि कव्य (तर्पणाच्या वेळी स्वधाकारासह केलेले तर्पण) अर्पण करून पितरांची पूजा कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
तिसरे वचन
कुटुम्बरक्षाभरणं यदि त्वं कुर्याः पशूनां परिपालनं च ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं तृतीयम् ।। ३ ।।
अर्थ : कन्या तिसरे वचन देतांना म्हणाली, ‘‘जर तुम्ही कुटुंबाचे पोषण, तसेच रक्षण आणि घरातील पाळीव प्राण्यांचे पालन कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
चौथे वचन
आयव्ययौ धान्यधनादिकानां पृष्ट्वा निवेशं च गृहे विदध्याः ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं चतुर्थम् ।। ४ ।।
अर्थ : कन्या चौथे वचन देतांना म्हणाली, ‘‘जर तुम्ही धनधान्य आदींचा उत्पन्न आणि व्यय माझ्या सहमतीने कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
पाचवे वचन
देवालयारामतडागकूपवापीर्विदध्या यदि पूजयेथाः ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं च पञ्चमम् ।। ५ ।।
अर्थ : कन्या पाचवे वचन देतांना म्हणाली, ‘‘जर तुम्ही यथाशक्ती देवालय, उद्यान, तलाव, विहीर, कुंड बनवून त्यांची पूजा कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
सहावे वचन
देशान्तरे वा स्वपुरान्तरे वा यदा विदध्याः क्रयविक्रयौ त्वम् ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं च षष्ठम् ।। ६ ।।
अर्थ : कन्या सहावे वचन देतांना म्हणाली, ‘‘जर तुम्ही विदेशात किंवा आपल्या नगरात किंवा कुठेही जाऊन व्यापार वा चाकरी कराल, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
सातवे वचन
न सेवनीया परपारकीया त्वया भवोद्भाविनि कामिनीति ।
वामाङ्गमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं च सप्तमम् ।। ७ ।।
अर्थ : कन्या सातवे वचन देतांना म्हणाली, ‘‘तुम्ही जीवनात कधीही परस्त्रीची सेवा किंवा आसक्ती ठेवू नये, तेव्हा (तर) मी तुमच्या डाव्या अंगाला येईन (तुमची पत्नी होईन.)’’
याचा थोडक्यात भावार्थ असा की, तीर्थयात्रा, व्रते, उद्यापने, यज्ञ, दान, देव-पितरांसाठी हव्यकव्य, कुटुंबरक्षणार्थ पशूपालन, धनधान्यांचे आणणे-नेणे, देऊळ, बाग, तलाव, विहिरी इत्यादींच्या ठिकाणी पूजेच्या वेळी, देश-विदेशांतील खरेदी-विक्री इत्यादी सारे तू माझ्यासह केल्यास मी हे पाऊल टाकते. अशी ६ पावले झाल्यावर ‘मी तुझी धर्मपत्नी आहे, तू परस्त्रीशी संबंध ठेवता कामा नये’, तर हे सातवे पाऊल टाकते.
या सर्व गोष्टींचा एकच हेतू ! उत्तम संतती, त्यामुळे उत्तम समाज ! त्यामुळे वैभवशाली सुखी सहजीवन आणि एक बलदंड नीतीमान राष्ट्रनिर्मिती होय!
(क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)