Kerala Wayanad Landslide : केरळ भूस्‍खलन : मृतांची संख्‍या २७० वर; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्‍यातील वायनाड जिल्‍ह्यात झालेल्‍या भूस्‍खलनाच्‍या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून आता २७० च्‍या वर गेला आहे. तसेच २०० पेक्षा अधिक जण घायाळ झाले आहेत. याखेरीज १९० नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्‍याखालून बाहेर काढल्‍याची माहिती केरळच्‍या आरोग्‍यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. युद्ध पातळीवर साहाय्‍यकार्य चालू असून खराब हवामान आणि पाऊस यांमुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

१. नागरिकांना जीवनावश्‍यक वस्‍तू मिळण्‍यासाठी सैन्‍याकडून कोळीकोड येथे नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहे.

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्‍यमंत्री पिनराई विजयन् यांच्‍याशी संवाद साधला असून केंद्रशासनाकडून सर्वतोपरी साहाय्‍य करण्‍यात येईल, असे आश्‍वासन दिले. मृत्‍यू झालेल्‍यांच्‍या कुटुंबियांना प्रत्‍येकी २ लाख, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्‍य देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा केंद्रशासनाकडून करण्‍यात आली आहे.

३. मुख्‍यमंत्री विजयन् यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून त्‍यात एकूणच परिस्‍थितीवर चर्चा होणार आहे.

४. हवामान विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार राज्‍यातील इडुक्‍की, त्रिशूर, पलक्‍कड, मलप्‍पुरम्, कोळीकोड, कन्‍नूर आणि कासरगोड जिल्‍ह्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. काही ठिकाणी पुन्‍हा भूस्‍खलनाची घटना घडू शकते. केरळ सरकारकडून ९६५६ ९३८ ६८९ आणि ८०८६ ०१० ८३३ असे दोन हेल्‍पलाईन क्रमांकही जारी करण्‍यात आले आहेत.

५. वायनाडचे जिल्‍हाधिकारी डी.आर्. मेगाश्री यांनी कुरुंबलाकोट्टा, लकिती मणिकुनू माला, मुट्टिल कोलपारा कॉलनी, कपिकलम्, सुधांगिरी आणि पोशुथाना भागात रहाणार्‍या लोकांना मुसळधार पाऊस अन् भूस्‍खलन होण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे घरे सोडण्‍यास सांगितले आहे.

६. मुंडक्‍काई ते चुरलमाला जोडण्‍यासाठी भारतीय सैन्‍य ८५ फूट लांबीचा पूल बांधत आहे. हा पूल २४ टन वजन सहन करू शकतो. पूल बांधल्‍यानंतर बचाव कार्याला वेग येईल, कारण पुलामुळे अवजड यंत्रे घटनास्‍थळी पोचू शकतील.