मुंबई – मणीपूरमध्ये सामाजिक अशांतता असल्याने पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, तेथील लोकांना दिलासा द्यावा, असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रातही असे काही घडेल कि काय ?, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित ‘सामाजिक एकता परिषदे’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
१. पवार म्हणाले की, मणीपूरमधील विविध जाती, धर्म आणि भाषा बोलणारे लोक आम्हाला भेटायला देहलीत आले. हे चित्र काय सांगते ? पिढ्यान्पिढ्या एकसंध असलेला प्रांत अशांत झाला, घरे पेटवली गेली. एकत्र राहून सौहार्द जपणारे मणीपुरी नागरिक आज एकमेकांशी बोलायला सिद्ध नाहीत. आज एवढे मोठे संकट राज्यावर आले असतांना त्याची काळजी घेण्याचे दायित्व शासनकर्त्यांचे आहे; पण दुर्दैवाने आजच्या शासनकर्त्यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
२. पवार यांच्या वरील वक्तव्याविषयी माध्यमांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले, ‘‘पवारांनी याला (दंगलींना) हातभार लावू नये.’’ भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भात म्हणाले, ‘‘त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही. महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. राज्यात तशी स्थिती नव्हती आणि नाही. काही लोक समाजात तेढ निर्माण करतात. तशी आंदोलने करतात आणि राज्यातील जनतेला विचलित करण्याचे काम करतात.’’
राज्याचा मणीपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये ! – राज ठाकरे
पुणे – राज्याचा मणीपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ‘महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो’, असे विधान शरद पवार यांनी केले. याविषयी राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी वरील विधान केले. ‘पुणे येथील पूर परिस्थितीची पहाणी करत असतांना राज्यामध्ये २ उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री असतांना याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही का ?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. |
संपादकीय भूमिका :मणीपूरमधील दंगली चीन आणि म्यानमार यांनी फूस लावल्याने अन् त्यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळत असल्याने कुकी ख्रिस्ती आतंकवादी करत आहेत. त्यांच्या विरोधात सरकार कारवाई करत आहे. असे असतांना महाराष्ट्रात दंगलींची भाषा करण्याविषयी वक्तव्य करून शरद पवार एकप्रकारे दंगलखोरांना प्रोत्साहनच देत आहेत, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? |