व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव कसा ठेवावा ?

‘जीवित रहाणे किंवा साधना करणे यांसाठी मनुष्याला प्राणवायू, सूर्यप्रकाश, आहार आदी विविध घटकांची आवश्यकता भासते. ‘आहार’ या एकाच घटकाचा जरी विचार केला, तरी त्यासंदर्भात किती व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव ठेवता येतो, हे पुढे दिले आहे. आहाराप्रमाणेच जीवनातील प्रत्येक घटकाविषयी व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव ठेवायचा प्रयत्न केला, तर अध्यात्मात लवकर प्रगती होते. याचे कारण म्हणजे, कृतज्ञताभावामुळे शरणागती लवकर निर्माण होते आणि गुरु किंवा देव परम दयाळू असल्याने तो शरणागतांवर लवकर कृपा करतो.

(पू.) श्री. संदीप आळशी

१. पंचमहाभूतांप्रती (पंचतत्त्वांप्रती) कृतज्ञता

पृथ्वी / माती (पृथ्वीतत्त्व), जल (आपतत्त्व), सूर्य (तेजतत्त्व), वायू (वायुतत्त्व) आणि आकाश (आकाशतत्त्व) यांमुळे अन्न निर्माण होते.

२. गुरु किंवा ईश्वर यांच्याप्रती कृतज्ञता


गुरु किंवा ईश्वर यांच्या कृपेमुळेच आपल्या भाग्यात अन्नग्रहण करणे शक्य होते; अन्यथा पृथ्वीतलावरील कित्येक जीव अन्न-पाणी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत असतात.

३. वनस्पती किंवा प्राणी यांच्याप्रती कृतज्ञता

वनस्पतींमुळे धान्य, भाज्या, फळे आदी, तर गाय-म्हैस यांच्यामुळे दूध, तूप आदी अन्न मिळते.

४. समाजाप्रती कृतज्ञता

शेतकरी, व्यापारी आणि भाजीवाले आपल्याला आहारासाठी लागणारे अन्नधान्य उपलब्ध करून देतात.

५. कुटुंबीय किंवा साधक यांच्याप्रती कृतज्ञता

घरी कुटुंबीय आणि आश्रमात साधक आपल्यासाठी भोजन सिद्ध करतात.

६. स्वतःच्या शरिराप्रती कृतज्ञता

आपले शरीर आहार ग्रहण करून कार्यक्षम रहाते; म्हणून आपण साधना करू शकतो.’

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.