अनगोळ, बेळगाव येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘२५ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण पू. दीक्षितआजींना साधना करतांना आलेल्या अनुभूती, त्यांना मिळालेले संतांचे आशीर्वाद आणि सनातन संस्थेशी संपर्क याविषयी जाणून घेतले. या भागात आपण त्यांची प.पू.डॉक्टर यांच्याशी झालेली भेट सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती, साधना करत असतांना त्यांना स्वतःत जाणवलेले पालट, प.पू. डॉक्टरांचा सत्संग आणि त्यांच्याप्रती भाव वृद्धींगत होणे, याविषयी पाहूया.     (भाग ३)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/817908.html

पू. (श्रीमती) विजया दीक्षित

६. प.पू. डॉक्टर यांचे झालेले दर्शन 

अ. २५.११.२००१ या दिवशी प.पू. डॉक्टर आठवले माझी मुलगी सौ. अंजली कणगलेकर हिच्याकडे मुक्कामासाठी आले होते. त्या वेळी माझी आणि त्यांची भेट झाली. मी त्यांना माझ्या साधनेबद्दल सविस्तर सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्ही जी साधना करत आहात, ती तशीच चालू ठेवा.’’ त्यानंतर मी पुष्कळ वर्षे तशीच साधना करत राहिले.

आ. एप्रिल २०१९ मध्ये मला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. त्या वेळी माझी प.पू. डॉक्टर यांचे दर्शन झाले.

इ. अनुमाने १८ वर्षांनंतर मला पुन्हा रामनाथी आश्रमात जाण्याचा योग आला. त्या वेळी आम्हाला त्यांचे जवळून दर्शन झाले. त्यांच्या चरणांवर डोके ठेवताक्षणीच ‘श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर डोके टेकून नमस्कार करत आहे’, असे वाटून माझा भाव दाटून आला. तेव्हा माझी भावस्थिती ४ दिवस टिकून होती.

७. ‘प.पू. डॉक्टर यांचे अवतारत्व लक्षात येणे आणि आत्मीयता वाढून श्रद्धा दृढ होणे

बेळगाव येथे माझ्या मुलीच्या घरी प.पू. डॉक्टरांची पहिली भेट झाली. त्या वेळी ‘ते एक मोठे संत आहेत’, असा माझा भाव होता. पुढे जसजशी सनातन संस्थेच्या कार्याची ओळख होत गेली, तशी त्यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव झाली. पुढे महर्षींच्या आज्ञेनुसार त्यांचे जन्मोत्सव साजरे होऊ लागले, तशी मला त्यांच्या अवतारत्वाची ओळख होत गेली. या कालावधीत माझी मुलगी, जावई आणि नातवंडे (चि. अंजेश आणि चि. सत्यकाम) यांच्याशी होणारे बोलणे आणि चि. सत्यकाम याचा होत असलेला दैवी प्रवास यांतून प.पू. डॉक्टर यांच्याबद्दल निराळीच आत्मीयता वाटू लागली अन् माझी श्रद्धाही दृढ होत गेली.’

८. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न

मी अहं निर्मूलनासाठी दुसर्‍यांचे स्वभावदोष न बघता त्यांचे गुण आत्मसात् करण्याचा प्रयत्न केला. मी रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात् केली. वेळ वाया जाऊ नये, यासाठी मी स्वतःला सतत कोणत्यातरी उद्योगात गुंतवण्याचा प्रयत्न केला. ‘मन हेच सर्व दोषांचे मूळ आहे’, हे जाणून त्याला योग्य मार्गाने विचार करण्याची सवय लावली. ‘स्वतःची चूक स्वीकारण्यात मनाचा मोठेपणा आहे’, हे जाणून मी चूक स्वीकारण्याची सवय लावली.

९. साधनेला आरंभ केल्यावर आलेल्या अनुभूती

९ अ. नामजप करतांना प.पू. डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून नामजप करण्याची आठवण करून देणे आणि त्यानंतर नामजप आपोआपच चांगला होऊ लागणे : ‘एक दिवस माझ्याकडून नामजप व्यवस्थित होत नव्हता. पूजा झाल्यावर मी देवासमोर डोळे मिटून स्वस्थ बसले होते. तेव्हा ‘प.पू. डॉक्टर धीम्या पावलांनी माझ्यामागे येऊन उभे राहिले आणि ते थोड्या जरबेनेच ‘नामजप’ असे म्हणाले अन् निघून गेले’, असे मला जाणवले. मी डोळे उघडून बघितले, तर तेथे कुणीच नव्हते. मी कृतज्ञतेने हात जोडून मनोमन नमस्कार केला आणि ‘आपली कृपा अशीच राहू दे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर माझा नामजप आपोआपच चांगला होऊ लागला.

९ आ. प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राची भावपूर्ण पूजा करणे : आम्ही आश्रमापासून दूर रहात असल्याने आम्हाला प.पू. गुरुदेवांची प्रत्यक्ष सेवा करणे शक्य नाही. यजमानांना संत म्हणून गौरवण्यात आले, त्या वेळी त्यांना प.पू. गुरुदेवांचे एक छायाचित्र भेट देण्यात आले. मी त्या छायाचित्राची प्रतिदिन सकाळी फुले वाहून पूजा करते आणि त्यांचा आशीर्वाद मागते. हीच माझी भावपूर्ण सेवा होते, ‘भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ।।’ (संत ज्ञानेश्वर महाराज) (हरिपाठ, अभंग ४, ओवी १) म्हणजे ‘भगवंताच्या ठिकाणी भाव असल्याविना भक्ती होईल आणि भक्तीविना मुक्ती मिळेल, असे जे म्हणतात, त्यांचे हे म्हणणे बळ नसतांना शक्तीची गोष्ट करण्याप्रमाणे व्यर्थ आहे.’

९ इ. साधनेच्या प्रवासात स्वतःत जाणवलेले पालट : मी नामजप करत असतांना माझ्या मनात अन्य विचार येत नाहीत. त्यामुळे मला मानसिक शांती आणि स्थैर्य लाभते. कोणत्याही गोष्टीविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया येत नाहीत. तेव्हा ‘माझी साधना उत्तम प्रकारे चालली आहे’, याची मला जाणीव असते.

१०. प.पू. डॉक्टर यांनी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण  सूत्रे

अ. प.पू. गुरुदेवांनी मला मानसपूजेपेक्षा नामजपावर अधिक भर देण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार मी माझा नामजप चालू ठेवला.

आ. प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुमचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.’’ मी त्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला आणि मनात म्हणाले, ‘आपला आशीर्वाद आम्हाला मिळत राहो.’

११. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील अविस्मरणीय क्षण

एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले असतांना मला प.पू. गुरुदेवांच्या सत्संगात उपस्थित रहाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी त्यांनी मला शिवाचे चित्र दाखवून ‘त्याविषयी काय वाटते ?’, असे विचारले होते. तेव्हा ‘शिवाचे डोळे अर्धाेन्मिलित असून ते जगावर दृष्टी ठेवून आहेत. ज्या ठिकाणी उत्तम कार्य चालते, तेथे ते आशीर्वाद देतात. ज्या ठिकाणी चुकीचे कार्य होत आहे, तेथे ते पूर्ण होऊ नये आणि काम करणार्‍यांची बुद्धी चांगली राहून ते कार्य देशहितासाठी व्हावे’, असे सांगत आहेत’, असे मला वाटते. मी दिलेले उत्तर प.पू. डॉक्टरांना आवडले आणि ते म्हणाले, ‘‘उत्तम.’’ ‘त्यांनी अकस्मात् मला विचारले, ‘‘तुम्हाला संत व्हायचे आहे ना !’’ तेव्हा मी उत्स्फूर्तपणे ‘हो’, म्हणाले आणि त्यांना नम्रतेने नमस्कार केला.’ हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

१२. प.पू. डॉक्टर म्हणजे प्रीतीचा सागर !

मी प.पू. डॉक्टर यांना सांगितले, ‘‘मी माझ्या यजमानांना गुरु मानले आहे.’’ तेव्हा त्यांना माझे पुष्कळ कौतुक वाटले. त्यांनी आम्हा दोघांच्या अंगावर एकच शाल घालून आम्हाला आशीर्वाद दिला. त्यांनी माझ्या यजमानांची चाकांची आसंदी आमच्या चारचाकी गाडीपर्यंत ढकलत आणली. आम्ही निघेपर्यंत ते चारचाकी गाडीजवळ थांबले होते.

प.पू. गुरुदेव हे साक्षात् दत्तगुरु आहेत, तरीही त्यांनी आमच्यासारख्या साधारण जिवांप्रती दाखवलेली प्रीती पाहून ‘गुरुदेव म्हणजे ‘प्रीतीचा सागर’, आहेत’, असे म्हणणेही तोकडेच वाटते. ‘आपल्यालाही त्यांच्यासारखे व्यापक व्हायचे आहे’, हा विचार सतत मनात रहातो.

१३. ब्रह्मोत्सवाला गेल्यामुळे कृतज्ञताभाव वाढणे

प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाला जातांना माझ्या मनात ‘मला दूरचा प्रवास करणे, तेथे बसून रहाणे आणि कार्यक्रमानंतर परत येणे, हे जमेल का ?’, असा विचार होता. ‘प.पू. गुरुदेव साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत, ते आपली काळजी घेणारच आहेत’, या भावाने मी गोव्याला जाण्याचे ठरवले. त्यानुसार आम्ही ब्रह्मोत्सवाला उपस्थित राहिलो. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनीच मला शक्ती देऊन हे करून घेतले. या प्रसंगामुळे माझ्या मनातील त्यांच्याप्रती भाव वृद्धींगत होऊन कृतज्ञता वाढण्यास साहाय्य झाले.

– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, अनगोळ, बेळगाव. १९.४.२०२४)

(क्रमशः)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/818627.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार  संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक