अनगोळ, बेळगाव येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘२३.७.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण पू. (श्रीमती) विजया दीक्षित आजी यांचे बालपण, त्यांच्या विवाहानंतर गुरुप्राप्ती होईपर्यंत त्यांनी केलेली साधना आणि त्यानंतर त्यांना गुरुप्राप्ती होईपर्यंतचा भाग पाहिला. आता या भागात आपण त्यांना साधना करतांना आलेल्या अनुभूती, त्यांना मिळालेले संतांचे आशीर्वाद आणि त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क याविषयी पाहूया.

(भाग २)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –  https://sanatanprabhat.org/marathi/816777.html

पू. (श्रीमती) विजया दीक्षित

३. साधना करत असतांना आलेल्या अनुभूती

३ अ. नरसोबाच्या वाडीला गेले असता नदीमध्ये पडून गटांगळ्या खाणे आणि एका अनोळखी माणसाने पाण्याच्या बाहेर काढल्यामुळे जीव वाचणे : एकदा मी आणि माझा धाकटा मुलगा चि. प्रसाद नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. तेथे नदीच्या घाटावर पुष्कळ माणसे अंघोळ करत होती. मी नेहमीप्रमाणे पाण्यात उतरले आणि माझा पाय घसरला अन् मी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. सर्व लोक बघत उभे होते; परंतु एक माणूस धावत आला आणि त्याने मला उचलून पाण्यातून बाहेर काढले. त्याने मला विचारले, ‘तुमच्या अंगावरील दागिने नीट आहेत ना ?’ मी म्हणाले, ‘‘सर्व ठीक आहे.’’ तेव्हा तो निघून गेला. माझ्या मनात विचार आला, ‘कोण असेल तो ?’ प्रत्यक्ष देवच त्याच्या रूपाने मला वाचवायला आला असल्याचे मला स्पष्ट जाणवले. तेथूनच मी देवाला नमस्कार केला.

३ आ. देवावर श्रद्धा ठेवल्याने मानसिक धैर्य वाढणे : कठीण प्रसंगांमुळे देवावर माझी अतूट श्रद्धा बसली. ‘संसारात अडचणी, जीवघेणी संकटे येणारच. त्यातून ‘देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून शांतपणे पार कसे पडायचे ?’, याचे ज्ञान आणि अनुभव येत गेल्याने माझे मानसिक धैर्य वाढले.

३ इ. झोपेत असतांना पिसासारखी हलकी होऊन हवेत तरंगत पुष्कळ उंच एका पोकळीत जाणे आणि तेथे श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : एकदा दुपारच्या वेळी माझा डोळा लागला होता. त्या वेळी मी अगदी पिसासारखी हलकी होऊन हवेत तरंगत होते. मी इतकी वर गेले की, त्या ठिकाणी केवळ आकाशाची निळी पोकळी होती. मी एकटीच त्या पोकळीत उभी होते. मला भीती वाटत नव्हती. पोकळीत मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते. कुठून तरी बासरीचे स्वर माझ्या कानावर पडत होते आणि मी शांतपणे ते स्वर ऐकत होते. नंतर मला जाग आली.

३ ई. झोपेत असतांना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणे : एकदा आम्ही गोंदवले येथे गेलो होतो. आम्ही संध्याकाळी पोचलो आणि आरतीला गेलो. आरतीच्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘माझी साधना योग्य प्रकारे चालू असेल, तर महाराजांनी मला काहीतरी अनुभूती द्यावी.’ मी दिवसभराच्या प्रवासाने गाढ झोपले. झोपेत माझ्या डोक्यावर कोणीतरी उजवा हात ठेवल्याचे मला जाणवले. तो स्पर्श पुरुषी होता आणि हाताची उष्णता मला जाणवत होती. मला वाटले की, ‘लवकर उठवण्यासाठी यजमानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे.’ डोळे उघडून पाहिले, तर तेथे कुणीच नव्हते. सर्व मंडळी गाढ झोपली होती. तेव्हा ‘महाराजांनीच माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि माझी साधना ठीक चालली असल्याचे मला सुचवले’, असे मला जाणवले. मी महाराजांना विनम्रपणे नमस्कार केला.

३ उ. कानात कुणीतरी जप सांगितल्याचे जाणवणे : एक दिवस मी नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले असतांना माझ्या उजव्या कानात कुणीतरी जप सांगत असल्याचे मला स्पष्टपणे ऐकू येत होते. तो आवाज पुरुषी होता. जप ऐकून मला एक वेगळेच समाधान वाटत होते. त्यानंतर माझा जप अधिकच आवडीने होऊ लागला.

३ ऊ. गुरुदेव प्रकाशमान होत असल्याचे जाणवणे : एका गुरुवारी आरतीच्या वेळी मला वेगळाच आनंद जाणवू लागला. संपूर्ण विश्वातील अणू-रेणूतून गुरुदेव प्रकाशमान होत असल्याचे मला जाणवत होते आणि मला वेगळाच प्रकाश जाणवत होता. मी गुरुदेवांना हात जोडले आणि विनम्रपणे त्यांच्या चरणांशी नतमस्तक झाले. तेव्हापासून माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिक होऊ लागला.

४. संतांचे आशीर्वाद

४ अ. यमकनमर्डीचे श्री हरिकाका गोसावी : माझ्या सासर्‍यांचे गुरु सद्गुरु सदानंद महाराज यांचे वास्तव्य अनगोळ (बेळगाव) येथे होते. तेथेच त्यांची समाधीही आहे. माझ्या यजमानांचे स्थानांतर गुजरातमधून कर्नाटकात झाल्यावर मिरजेला माहेरी जातांना बहुतेक वेळा आमचा बेळगावला मुक्काम व्हायचा. त्या वेळी आम्ही माझ्या सासर्‍यांच्या गुरूंच्या समाधीचे दर्शन घ्यायला जायचो. तेव्हा यमकनमर्डीचे श्री हरिकाका गोसावी यांचेही दर्शन होत असे. एकदा श्री हरिकाका यांनी मला कुंकू लावून माझ्या ओटीत नारळ घातला आणि ‘अध्यात्मात चांगली प्रगती करशील’, असा आशीर्वाद दिला होता.

४ आ. पू. कलावतीआई : माझ्या यजमानांचे स्थानांतर बेळगावला झाले. आमचे वास्तव्य अनगोळ भागात होते. तेथे जवळच पू. कलावतीआईंचे वास्तव्य होते. माझे यजमान त्यांचे ‘फॅमिली डॉक्टर’ असल्याने त्यांचे पू. आईंकडे जाणे-येणे व्हायचे. तेव्हा पू. कलावतीआईंनी ‘तुमच्या हातून पुष्कळ सेवा घडेल’, असे मला म्हटले होते.

४ इ. माझे गुरु श्री. वेल्हाळ यांनी, ‘तुम्ही अध्यात्मात पुष्कळ प्रगती कराल’, असे सांगितले होते.

५. सनातन संस्थेशी संपर्क

माझी मुलगी सौ. अंजली कणगलेकर आणि जावई श्री. यशवंत कणगलेकर यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना अन् सेवा करण्यास आरंभ केला. त्यानंतर वर्ष १९९७ मध्ये माझा सनातन संस्थेच्या कार्याशी परिचय झाला.

– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, अनगोळ, बेळगाव. (१९.४.२०२४)

(क्रमशः)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक