अनगोळ, बेळगाव येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘२६ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण पू. दीक्षितआजींनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर आलेल्या त्यांना अनुभूती, साधना करत असतांना त्यांना स्वतःत जाणवलेले पालट, प.पू. डॉक्टरांचा त्यांना लाभलेला सत्संग आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव वृद्धींगत होणे, याविषयी पाहिले. या भागात आपण पू. दीक्षितआजींना संतपद प्राप्त होणे, साधना करत असतांना घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना, कुटुंबियांविषयीची सूत्रे आणि कुटुंबियांनी सांगितलेली सूत्रे पहाणार आहोत. 

(भाग ४)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/818286.html

पू. (श्रीमती) विजया दीक्षित

१४. साधनेमध्ये प्रगती होण्यातील टप्पे

१४ अ. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी ते ‘संतपद’ हा प्रवास : वर्ष २०१७ मध्ये बेळगाव येथे आमच्या रहात्या घरी श्री. काशीनाथ प्रभु यांच्या हस्ते श्रीकृष्णाचे चित्र देऊन प.पू. गुरुदेवांनी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केली होते. २४.४.२०१९ यादिवशी माझे पती डॉ. दीक्षित यांना संत म्हणून गौरवण्यात आले. त्या वेळी माझी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असल्याचे सांगून माझा सत्कार करण्यात आला होता. रामनाथी आश्रमात माझी प.पू. गुरुदेवांशी भेट झाली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुमची साधना चांगली चालली आहे आणि तुमची प्रगती लवकर होईल.’’

१४ आ. ६० टक्के पातळी ते संतपद या साधना प्रवासात आलेल्या अनुभूती

अ. ६० टक्के पातळी ते संतपद या साधनाप्रवासात ‘प.पू. गुरुदेवच सर्वकाही करून घेत आहेत’, ही जाणीव पक्की झाली.

आ. या कालावधीत मनातील विचार आणि प्रतिक्रिया न्यून झाल्या. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य झाले.

इ. ज्याप्रमाणे लहान मूल आईवर विसंबून रहाते, त्याप्रमाणे मला प.पू. गुरुदेवांवर सर्व भार टाकून बुद्धीलय करता आला.

१४ इ. ‘संतपद’ प्राप्त होणे : २७.७.२०२० या दिवशी माझे यजमान पू. डॉ. दीक्षित यांनी देह ठेवला. त्यानंतर एक वर्षभर मी कुठेच गेले नाही. त्यानंतर घरातून बाहेर पडायचे, तर ‘अन्य नातेवाइकांकडे जाण्यापूर्वी आश्रमातच जायचे’, अशी मला तळमळ होती. माझ्या सुदैवाने आणि प.पू. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आम्हाला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात यायला मिळाले. आश्रमात आल्यावर माझे मन शांत झाले. प.पू. गुरुदेवांच्या सत्संगात उपस्थित रहाण्याची मला संधी मिळाली. तेव्हा ‘प.पू. गुरुदेवांनी ‘मी संत होणार’, असे सूचित केले होते. मी किती भाग्यवान !’ हे मला आठवले. कार्तिक शुक्ल त्रयोदशी (१७.११.२०२१) या माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझी पातळी ७१ टक्के असल्याचे सांगून मला ‘संत’ म्हणून गौरवण्यात आले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन माझा सन्मान करण्यात आला आणि वाढदिवस म्हणून त्यांनी माझे औक्षणही केले.

१५. प.पू. डॉक्टर यांनी ‘ पू. दीक्षितआजी यांच्याकडून देव हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समष्टी नामजप करण्याचे कार्य करवून घेणार आहे’, असा आशीर्वाद देणे

खरंच ! हे केवळ प.पू. गुरुदेवच करू जाणे ! एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या साधारण मुलीचा केवढा तो गौरव ! ही सर्व प.पू. गुरुदेवांचीच कृपा आहे. या सोहळ्यात माझा मुलगा श्री. जयंत, सून सौ. अनघा, मुलगी सौ. अंजली, जावई, नातवंडे (श्री. अनुज, डॉ. अंजेश आणि श्री. सत्यकाम), काही साधक आणि दैवी बालके यांनी माझ्याबद्दल बोलून माझे कौतुक केले. माझ्या आयुष्यात एवढा मोठा सोहळा घडणे, ही वैशिष्ट्यपूर्ण घटनाच होय ! प.पू. गुरुदेवांनी मला संतपद प्राप्त झाल्याच्या निमित्ताने ‘देव यांच्याकडून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समष्टी नामजप करण्याचे कार्य करून घेणार आहे’, असा आशीर्वाद दिला आहे.

१६. कुटुंबियांतील अन्य सदस्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक असल्याचे घोषित होणे

वर्ष २०१९ मध्ये माझे पती आधुनिक वैद्य दीक्षित यांना सनातनचे ८७ वे व्यष्टी संत म्हणून गौरवण्यात आले होते. माझे दीर श्री. शिवराम दीक्षित यांची मृत्यूनंतर ६१ टक्के पातळी घोषित करण्यात आली आणि माझ्या जाऊबाई श्रीमती शैलजा शिवराम दीक्षित यांची पातळी ६१ टक्के घोषित करण्यात आली आहे.

१७. मागील पिढीतील कुणी उन्नत किंवा संत असणे

आमच्या पूर्वजांपैकी विजापूरचे थोर विठ्ठलभक्त संत श्री रुक्मांगद पंडित हे माझे आजेसासरे वैद्य होते. त्यांचा नावलौकिक पुष्कळ दूरवर पसरला होता.

१८. कृतज्ञता

माझे गुरु श्री. वेल्हाळ आणि माझे पती पू. (डॉ.) दीक्षित यांच्याकडून मला वेळोवेळी जे मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. प.पू. डॉ. आठवले माझ्या उतारवयात जीवनात आले आणि त्यांनी साधना वाढवण्यासाठी मला मार्गदर्शन केले. त्यांनी साधना करवून घेतल्याने माझी आध्यात्मिक पातळी वाढली आणि मला संतपद प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

१९. प्रार्थना

‘अखेरचा श्वास घेतांना माझे मस्तक प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी  असावे, त्यांचे रूप माझ्या डोळ्यांत असावे आणि माझ्या मुखात नामजप असावा’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’

(समाप्त)

– (पू.) श्रीमती विजया दीक्षित, अनगोळ, बेळगाव

(१९.४.२०२४)


पू. दीक्षितआजींविषयी कुटुंबियांनी सांगितलेली सूत्रे

१. सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (पू. विजया दीक्षित यांची मुलगी)

सौ. अंजली कणगलेकर

अ. पू. आईंना रात्री झोपायला कितीही वेळ झाला, तरी पहाटे लवकर उठून त्या सडा-रांगोळीपासून सगळी कामे आटपायच्या. आजोबा देवपूजा करायचे. पू. आई देवपूजेची सिद्धता वेळेवर करून ठेवायच्या. सगळ्यांचा स्वयंपाक, कुणाला काय हवे-नको, सगळे पू. आई स्वतः जातीने पहात असत.

आ. पू. आई नित्यनेमाने व्यायाम करतात. वयाच्या ९२ व्या वर्षीही त्या पहाटे उठून चालणे, धावणे आणि अन्य व्यायाम न चुकता करतात.

इ. पू. आईंमध्ये राष्ट्राप्रती प्रेम आहे. त्यामुळे राजकारणात चाललेल्या घडामोडी त्या जाणून घेतात. त्या स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेतर्फे चालणार्‍या वर्गांना नियमितपणे जात आणि पुढाकार घेऊन सेवा करत. पू. वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना वर्गांना जाणे जमेनासे झाले. त्या वेळी दूरभाषवरून संपर्क साधून त्या काही सेवा करत.

ई. संकटकाळात आणि आणीबाणीच्या काळातही त्यांनी पुष्कळ सेवा केली आहे.

उ. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांप्रती पुष्कळ नामजपही केला आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू झाल्यापासून देव, देश आणि धर्म यांसाठी येणार्‍या लिखाणाचा त्या अभ्यास करतात.

ऊ. ‘सनातन प्रभात’ साप्ताहिकात सांगितल्यानुसार त्या नामजपही करतात.

१ ए. पू. आईंचा स्थूलदेह आणि त्यांच्या वापरातील वस्तू यांमध्ये झालेले पालट

१. पू. आईंचे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ लागले आहेत.

२. त्यांची त्वचा चमकदार दिसत असून चेहर्‍यावरील त्वचेला गुलाबी छटा आली आहे.

३. त्यांच्या कपड्यांना सुगंध येतो.

२. सौ. सिंधु कुलकर्णी, ईश्वरपूर, जि. सांगली. (पू. विजया दीक्षित यांची बहीण) 

२ अ. समभावाने वागणे : ‘माझी बहीण पू. विजया या बालपणापासून सर्वांशी समभावाने वागत असत. त्यांच्यामध्ये ‘इतरांना साहाय्य करणे’, हा गुण बालपणापासूनच आहे.

२ आ. इतरांचे कौतुक करणे : कुणी एखादी कृती त्यांच्यापेक्षा अधिक चांगली केली, तर त्या तत्परतेने त्याचे मनापासून कौतुक करतात. कुणी नवीन काही शिकत असेल, तर त्या त्याला प्रोत्साहन देतात.’

(सर्व सूत्रांसाठी दिनांक (१९.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक