महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, ७ सप्टेंबर (वार्ता.) – ‘गणपति बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्री गणेशाचे आगमन झाले. या वेळी अनेक ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजवलेल्या भक्तिगीताच्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. गणरायाच्या आगमनाची आबालवृद्धांपासून प्रत्येक जण आतुरतेने वाट पहातो, त्यामुळे अवघा महाराष्ट्र गणेशमय होऊन गेला. श्री गणेशाच्या आगमनासाठी अनेक ठिकाणचे सहकुटुंब रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

मुंबईतील बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी काही दिवस अगोदरच वाजतगाजत श्री गणेशमूर्ती मंडपस्थळी स्थानापन्न केली, तर काही मंडळांनी गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती आणल्या.

पुणे – मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाची विधीवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची सिंह रथातून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक मार्गावर गणरायाच्या आगमनाची छोटेखानी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये दोनदा पावसाची सर आल्यानंतरही कार्यकर्त्यांचा आणि पथकातील वादकांचा उत्साह तसूभरही अल्प झाला नव्हता.

कोल्हापूर – शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, ताराबाई पार्क, लक्षतीर्थ वसाहत, उजळाईवाडी यांसह शहरातील एकही रस्ता असा नव्हता जिथे श्री गणेशभक्त दिसत नव्हता.