आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयोजित केलेल्या सोहळ्यांच्या ठिकाणी करण्यात आलेले मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. 

१. गुरुपौर्णिमा आणि श्री गुरूंचे महत्त्व

(सद्गुरु) नंदकुमार जाधव

गुरुपौर्णिमा म्हणजे देहधारी गुरु किंवा गुरुतत्त्व यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! हिंदु धर्मपरंपरेमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे दर्शन घेणे, गुरूंना दक्षिणा देणे, गुरूंची सेवा करणे किंवा गुरुकार्य करण्याचा संकल्प करणे, यांना विशेष महत्त्व आहे. हिंदु संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे; कारण ‘ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे गुरु शिकवतात. गुरूंच्या मार्गदर्शनाविना ईश्वराकडे जाता येत नाही. एखाद्याने रस्ता सांगितला किंवा वाटाड्या म्हणून तो सोबत आला, असे गुरूंचे नसते. ते आशीर्वाद देऊन शिष्याला ईश्वराकडे जाण्यासाठी सूक्ष्मातून बळही पुरवतात. शिळेपासून शिल्प बनते; पण त्यासाठी शिल्पकार लागतो. साधक आणि शिष्य ईश्वरप्राप्ती करू शकतात; पण त्यासाठी गुरु आवश्यक असतात. गुरुचरित्रात म्हटले आहे की, गंगेमुळे पाप, चंद्रामुळे ताप, म्हणजे मानसिक तणाव आणि कल्पतरूमुळे दैन्य-दारिद्र्य नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप, दैन्य यांचे हरण होते. (हे तिन्ही त्रास दूर होतात.)

गुरुप्राप्ती किंवा गुरुकृपा कधी होईल ? अखंड गुरुकृपेसाठी काय करावे ? असे प्रश्न मनात येतात. केवळ साधना करूनच गुरुप्राप्ती किंवा गुरुकृपा होऊ शकते. साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीमुळे होणारा सर्वाेच्च आनंद सातत्याने मिळण्यासाठी प्रतिदिन करायचे प्रयत्न !

२. साधना करण्याचे महत्त्व

साधनेमुळे गुरुकृपा होऊन आध्यात्मिक उन्नती होते. भौतिक किंवा व्यावहारिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती, या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. एखादी व्यक्ती कितीही शिकलेली असली, तरी ती सुसंस्कारित असेलच, असे नाही. कित्येक सुशिक्षित व्यक्ती मोठा भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळून गेल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. आज समाज शिकलेला आहे; पण तरीही घटस्फोटांचे, वृद्धाश्रमांचे, भ्रष्टाचाराचे आणि फसवणुकीचे प्रकार अन् प्रमाण वाढले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे व्यक्तीची व्यावहारिक किंवा भौतिक प्रगती होत असली, तरी आध्यात्मिक प्रगती मात्र दुर्लक्षित होत आहे. ईश्वराची आध्यात्मिक पातळी १०० टक्के मानली, तर कलियुगात सर्वसामान्य मनुष्याची पातळी २० टक्के आहे. साधनेमुळे आध्यात्मिक पातळी वाढत जाते. ६० टक्के आध्यात्मिक पातळीला ती व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून मुक्त होते. मृत्यूनंतर अशा जिवाला पुन्हा पृथ्वीवर जन्म नसतो, तर उच्च लोकांमध्ये त्या जिवाची पुढची साधना चालू होते. साधना करण्याचे महत्त्व केवळ आध्यात्मिक दृष्टीने आहे, असे नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक भूमिकेत साधनेचे महत्त्व आहे.

 

आपण सुखप्राप्तीसाठी धडपडतो; पण सुखापेक्षा आपल्या वाट्याला दुःखच अधिक येते. कधीकधी पुष्कळ प्रयत्न करूनही वाट्याला अपयश येते. हे असे का होते ? याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. जीवनातील दुःखदायक प्रसंगांकडे साक्षीभावाने कसे पहायचे ? प्रसंगांची तीव्रता कशी न्यून करायची ? हे विज्ञान नव्हे, तर अध्यात्मच सांगू शकते. त्यामुळे कुणी असे म्हणू शकत नाही की, अध्यात्म-साधना आणि माझा संबंध काय ? साधनेमुळे प्रारब्ध भोगण्याची क्षमता प्राप्त होते. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, मनाप्रमाणे घटना घडोत किंवा मनाविरुद्ध घडोत, मन प्रसन्न कसे ठेवायचे ? स्थिर कसे रहायचे ? आनंदी कसे  रहायचे ? हे साधनेमुळेच कळू आणि जमू शकते. आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत मीराबाई यांची उदाहरणे ठाऊक असतील. मीराबाईंना जिवे मारण्याचे प्रयत्न होऊनही त्यांची श्रीकृष्णभक्ती तसूभरही न्यून झाली नाही आणि सर्व संकटांतून त्या बाहेर पडल्या. हे साधनेचे सामर्थ्य आहे. जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ साधनेनेच मिळते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती; पण त्यांच्या आनंदावस्थेत फरक पडला नाही. ते पांडुरंगाच्या अनुसंधानात असायचे. ‘परिस्थिती कशीही असली, तरी साधनेच्या बळावर आनंदी रहाता येते’, ही शिकवण संत तुकाराम महाराजांच्या चरित्रातून मिळते. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद साधनेनेच मिळतो. श्रद्धा, त्याग, धैर्य हे दैवी गुण अंगी निर्माण होतात. मनुष्याचे जीवन आदर्श अन् परिपूर्ण होण्यास साहाय्य होते. साधनेमुळे बुद्धी सात्त्विक होते. सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. ईश्वरप्राप्तीची ओढ असो वा नसो, समाधानी जीवन जगण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे.

३. आनंदप्राप्तीसाठी साधना  

३ अ. सद्यःस्थिती : सध्या बहुतेकांचे जीवन धावपळ आणि कटकटी यांनी ग्रासलेले आहे. मनःशांती हरवली आहे. ताणतणाव तर आयुष्याचा भाग झाला आहे. शाळेत जाणारे लहान मूल किंवा वयोवृद्ध असो, प्रत्येकालाच ताणाचा सामना करावा लागतो. कार्यालय किंवा व्यवसाय येथे ताण असतो, तसेच कुटुंबातही काही ना काही कुरबुर चालू असते. सततच्या ताणामुळे मनुष्याचा स्वभाव चिडचिडा होतो. निरुत्साह, नैराश्य आणि अशांती त्याच्या वाट्याला येते.

यांचा सामना करायचा असेल, तर साधनाच करायला हवी. मनःशांती, समाधान, आनंद या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत, तर त्या साधनेमुळेच मिळू शकतात. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म; म्हणूनच ‘सुखं तु न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो  भवेत् ।’ (अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक २०) म्हणजे ‘धर्माविना सुख संभवत नाही; म्हणून धर्मपरायण असावे.’ गुरुकृपेविना अध्यात्माचे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अध्यात्म हा बौद्धिक स्तरावर समजून घेण्याचा नाही, तर कृती करून अनुभूती घेण्याचा विषय आहे. आपल्यापैकी काही जण साधना करत असतील, तर काहींनी ती करायला आरंभ केला नसेल; पण गुरुतत्त्वाला शरण जाऊन कृतज्ञताभावाने साधना करण्यात जीवनाचे सार्थक आहे !

३ आ. स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन : साधना करतांना ‘स्वतःत पालट होत आहे ना ?’, हे पहाणे महत्त्वाचे असते. ‘स्वतःला सुधारणे’, ही साधना आहे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाला सुधारायला जातो, तेथेच चुकते. स्वतःत सुधारणा करण्याचे पहिले पाऊल म्हणजे स्वपरीक्षण करणे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास अध्यात्मात प्रगती होऊ शकत नाही. आपण वर्षानुवर्षे आहोत, त्याच टप्प्याला रहातो. व्यवहारात पहिलीतून दुसरीत जाणे, दुसरीतून तिसरीत जाणे असते, तसे अध्यात्मातही पुढच्या टप्प्याला जायचे असते. त्यासाठी स्वतःतील स्वभावदोष घालवून आणि अहंकार न्यून करून दैवी गुण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. दोषांचा केवळ साधनामार्गामध्येच अडथळा आहे, असे नाही, तर मन अशांत, असमाधानी आणि तणावग्रस्त असण्यामागेही हे दोषच कारणीभूत ठरतात. सगळ्या धर्मग्रंथांमध्येही षड्रिपूंपासून दूर रहाण्याचा उपदेश आहे; पण याकडे दुर्लक्ष झाल्याने एकमेकांमध्ये खटके उडणे, इतरांशी तुलना होऊन मन अस्वस्थ होणे, इतरांकडून अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण होत नसल्याने अपेक्षाभंगाचे दुःख येणे, असे घडते. ‘इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट घडणे, मागच्या बर्‍या-वाईट कर्मांची आठवण होणे आणि भविष्याची काळजी वाटणे’, या कारणांमुळे मनाचे स्वास्थ्य बिघडते. आज मेंदू तल्लख असला, तरी मन सक्षम नाही. कुणी काही बोलले, तर लगेच वाईट वाटते; मनाप्रमाणे झाले नाही, तर निराशा येते. अडचणी किंवा संकटे आली की, हताश व्हायला होते. ही कमकुवत मनाची लक्षणे आहेत.

मन सक्षम आणि निर्मळ करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन अन् गुणसंवर्धन’ प्रक्रिया सांगितली आहे. स्वतःत सकारात्मक पालट करण्यासाठी स्वयंसूचना देणे आणि त्यानुसार कृती करणे, हा या प्रक्रियेचा गाभा आहे. ‘स्वभावाला औषध नाही’, असे म्हटले जात असले, तरी ही प्रक्रिया म्हणजे स्वभावाचे औषधच आहे. ही प्रक्रिया म्हणजे एकप्रकारे मनाचे ‘ब्युटीपार्लर’ आहे. आनंदी जीवनासाठीची ही संजीवनी आहे. ही प्रक्रिया राबवून सहस्रो जणांनी त्यांच्या स्वभावात आमूलाग्र पालट झाल्याची अनुभूती घेतली. सनातनच्या सत्संगांत ही प्रक्रिया, तसेच गुरुकृपायोगानुसार साधना शिकवली जाते. ही प्रक्रिया शिकायची असेल, तर या सत्संगांमध्ये सहभागी व्हा. मनाची निर्मळता आणि चित्तशुद्धी झाल्यास भगवंताची प्राप्ती दूर नाही. स्वप्रयत्नांनी या गोष्टी साध्य होणे कठीण असते. त्यासाठी गुरुकृपा आणि आध्यात्मिक ऊर्जाच हवी.

३ इ. नामजप : कलियुगातील आध्यात्मिक ऊर्जेचा सहजसोपा स्रोत म्हणजे नामजप ! श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २५) म्हणजे ‘सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे.’ नामानेच वाल्याचा वाल्मीकि होऊ शकतो. आपण साधनेच्या आरंभिक अवस्थेला असू, तर आपण कुलदेवतेचा आणि दत्तगुरूंचा जप करावा.

कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते. आपली कुलदेवी भवानीदेवी असेल, तर ‘श्री भवानीदेव्यै नमः’; कुलदेवी महालक्ष्मी असेल, तर ‘श्री महालक्ष्मीदेव्यै नमः’, असा नामजप करावा. कुलदेवी माहीत नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः’ असा जप करावा, तर पितृदोष दूर होण्यासाठी दत्तगुरूंचा ‘श्री गुरुदेव दत्त’ असा नामजप करावा. आपण गुरुमंत्राचा किंवा अन्य कुठला जप करत असू, तर तो अखंड आणि भावपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा.

मोठा अधिकारी आपल्या स्वाक्षरीचा शिक्का करतो. तो शिक्का ज्याच्या हातामध्ये असतो, तो मनुष्य त्या शिक्क्याच्या साहाय्याने त्याच्या साहेबाच्या इतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या संदर्भातही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो, तेच काम त्याचे नाम करते. नामजपामुळे प्रारब्ध जळते. आपण घेतलेले एकही नाम वाया जात नाही. नामस्मरणच सद्गुरूंची भेट घडवते. आपण या जन्मात घेतलेले शिक्षण, तसेच कमावलेले पैसे किंवा प्रसिद्धी, यांपैकी काहीच मृत्यूनंतर आपल्यासमवेत येत नाही. मृत्यूनंतर आपल्यासमवेत येते, ती म्हणजे आपली साधना !

मनुष्यजन्माचा उद्देशच प्रारब्धभोग संपवणे आणि ईश्वरप्राप्ती करवून घेणे, हा आहे; पण हे ठाऊक नसल्याने किंवा त्याचे महत्त्व मनावर न बिंबल्याने शिक्षण, घर, नोकरी, संसार, गाडी, बंगला यांमध्येच मनुष्य अडकतो आणि त्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. या भवसागरातून मुक्त व्हायचे असेल, तर नामाच्या होडीत बसायला हवे. काही जणांना वाटते की, मी उद्यापासून किंवा परिस्थिती चांगली आली की, नामस्मरण करीन; पण अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, परिस्थिती चांगली आली की मी नाम घेईन, असे म्हणणारा नाम कधीच घेत नाही. ‘आपल्या मनात नामजप करण्याचा विचार आला, तर तो आपला नसून श्री गुरुतत्त्वाने आपल्याला दिलेला विचार आहे’, हे लक्षात घेऊन आपण नामजप करायला आरंभ करावा. नामजपासाठी स्थळ-काळ-वेळ, शौच-अशौच आदी कशाचेच बंधन नसते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण अखंड नामजप करण्याचा संकल्प करूया.

३ ई. सत्सेवा : नामजप करणे, तसेच स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे, ही व्यष्टी, म्हणजेच वैयक्तिक साधना झाली. कलियुगात व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न, तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न. गुरूंचे नुसते दर्शन घेण्याने २ टक्के गुरुकृपा होते. गुरूंना केवळ अध्यात्मविषयक प्रश्न विचारण्याने १० टक्के गुरुकृपा होते, तर अध्यात्माचा पूर्णवेळ परिणामकारक प्रसार करण्याने १०० टक्के गुरुकृपा होते. गुरूंचे कार्य काय असते ?, तर समाजाला साधनेकडे वळवणे. गुरूंच्या या कार्यात जो सहभागी होतो, तो गुरूंना ‘आपला’ वाटतो. यासंदर्भात एक चांगला दृष्टांत आहे. एकदा एक गुरु त्याच्या २ शिष्यांना थोडे गव्हाचे दाणे देतात आणि सांगतात, ‘ते सांभाळून ठेवा.’ जेव्हा गुरु काही काळाने परत येतात, तेव्हा पहिला शिष्य त्याने एका डब्यात सांभाळून ठेवलेले ते दाणे गुरूंना देतो, तर दुसरा शिष्य त्याने शेतात दाणे पेरून उगवलेले पीक गुरूंना दाखवतो. अर्थातच् दुसरा शिष्य गुरूंना अधिक आवडतो. थोडक्यात, आपल्याला जी साधना समजली, ती इतरांना सांगणे, तसेच तन-मन-धन गुरुकार्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी अर्पण करणे, ही सत्सेवा आहे. आपल्याला श्रीगुरूंच्या सगुण रूपाची सेवा करण्याची संधी मिळेल कि नाही ?, माहीत नाही; पण आपल्याला अगदी प्रत्येक क्षणी श्री गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा करण्याची, अर्थात् सत्सेवेची संधी उपलब्ध आहे. अध्यात्मप्रसार आणि धर्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे. त्यामुळे आपल्याला देवाने जे कौशल्य दिले आहे, जे काही गुण दिले आहेत, जी कला दिली आहे, ती आपण गुरुसेवेसाठी समर्पित करूया. दिवसभरात किमान १ घंटा तरी सेवेसाठी देण्याचा आपण संकल्प करूया. सत्सेवा करणे म्हणजे गुरु-शिष्य परंपरेच्या कार्यात योगदान देण्यासारखेच आहे. गुरु-शिष्य परंपरेने समाजामध्ये धर्म-अध्यात्म-भक्ती यांचा प्रसार करून सामाजिक जीवन उन्नत करण्याचे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे अन् धर्मसंस्थापनेचेही कार्य केले, उदा. श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदासस्वामी-छत्रपती शिवाजी महाराज. या परंपरेमुळेच हिंदु धर्म अनेक परकीय आघात होऊनही समर्थपणे टिकून राहिला आहे. आजच्या काळातही अशाच प्रकारचे कार्य करण्याची आवश्यकता आहे.

४. रामराज्याची आवश्यकता

सध्या सनातन धर्म संपवण्याच्या वल्गना उघडपणे केल्या जातात. ‘सनातन धर्म ही कीड आहे, कुष्ठरोग आहे’, अशी जाहीर विधाने केली जातात आणि कुणाच्याही विरोधात काहीही कारवाई होत नाही. पुरोगामी, साम्यवादी, ‘अर्बन (शहरी) नक्षलवादी’ अशा वेळी गप्प असतात. ‘सर तन से जुदा’, ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा दिल्या, तरी ते गप्प असतात. हेच लोक गाझापट्टीतील सक्रीय आतंकवादी संघटना ‘हमास’च्या समर्थनार्थ मोर्चे काढतात. मुंबईवर आतंकवादी आक्रमणात मृत्यूमुखी पडलेले पोलीस अधिकारी ‘हेमंत करकरे यांना कसाबने नव्हे, तर पुण्यातील ब्राह्मणांनी मारले’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे कसाबची बाजू घेतात. ‘श्रीरामजन्मभूमीवर मंदिर नव्हे, तर रुग्णालय बांधा, असा सल्ला देतात आणि दुसरीकडे ‘वन्दे मातरम्’चा आग्रह धरला, तर मात्र कट्टरता अन् असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करतात, तसेच हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना, संस्थांना आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करतात. या टोळ्यांकडून जे काही हिंदुविरोधी, राष्ट्रविरोधी ‘नॅरेटिव्हज्’ (कथानक) प्रस्थापित केले जातात, ते हाणून पाडण्याची आणि धर्मनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ तेजस्वी विचार समाजात रुजवण्याची आवश्यकता आहे. हेही गुरुकार्यच आहे.

आज सनातन धर्माची जी जी प्रतीके आहेत, ती विकृत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपण भक्तीभावाने मंदिरात जातो; अर्पण करतो. या देवनिधीचा विनियोग देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी व्हायला हवा; पण तसे होत नाही. सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केल्यामुळे हिंदूंनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) सरकारकडे जातो. त्यातून मग देवाच्या दागिन्यांमध्ये, अर्पणपेट्यांमध्ये भ्रष्टाचार होतो. पूर्वी परकीय आक्रमक मंदिरे लुटायचे आणि आज स्वतंत्र भारतात सरकारीकरणाच्या माध्यमातूनही तेच चालू आहे. सरकारीकरण झालेल्या काही मंदिरांमध्ये अशा पुजार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत की, त्यांना ना मंत्र म्हणता येतात, ना पूजेचे विधी करता येतात. मंदिरांच्या शेकडो एकर भूमींवर अतिक्रमण झाले आहे.

मंदिरांची अशी स्थिती आहे, तर दुसरीकडे ‘वक्फ कायद्या’च्या अंतर्गत ‘वक्फ बोर्डा’च्या भूमी दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातील सुमारे ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे. भारतीय रेल्वे आणि भारतीय सेना यांच्यानंतर वक्फ बोर्डाकडे देशातील सर्वाधिक भूमीची मालकी आहे. वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाला ‘कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता वक्फची आहे’, असे घोषित करण्याचा अधिकार आहे. अगदी ‘हिंदूंची वडिलोपार्जित किंवा स्वकष्टाने मिळवलेली भूमी वक्फ बोर्डाची आहे’, असेही घोषित केले जाऊ शकते. त्याविरोधात साध्या न्यायालयात नाही, तर वक्फ न्यायालयातच दाद मागता येऊ शकते. याचा अर्थ न्याय मिळण्याची शक्यता जवळपास शून्य. तमिळनाडू येथे तर १ सहस्र ५०० वर्षे जुन्या मंदिरासह एक संपूर्ण गाव वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे !

हिंदु संस्कृतीवर आघात करण्याचे अजून एक माध्यम म्हणजे ‘वेब सीरिज’, ‘बॉलीवूड’ आणि ‘नेटफ्लिक्स’ यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म ! यावर ज्या मालिका दाखवल्या जातात, त्यांतून भारतीय स्त्रीचे आणि कुटुंबाचे विकृत चित्रण केले जाते. तोकड्या कपड्यांत वावरणारी, हातात दारूचा ग्लास असणारी, नवरा सोडून परपुरुषाच्या मागे असणारी विवाहिता दाखवली जाते. कुठल्या सर्वसाधारण भारतीय कुटुंबात असा प्रकार होतो? पण कलास्वातंत्र्याच्या नावाखाली हे दर्शकांवर लादले जाते. ‘लव्ह जिहाद’ फोफावण्यामागे ‘बॉलीवूड’चा मोठा हात आहे. शाळा-महाविद्यालयांमधून रामायण-महाभारताचे धडे देणे दूरच; पण राम-सीता यांवर अश्लाघ्य टीका करणारी नाटके दाखवली जातात. हिंदूंच्या शोभायात्रा आणि मिरवणुका यांवर होणारी दगडफेक, ‘हलाल सर्टिफिकेशन’, दंगली, ‘ड्रग्ज’चा (अमली पदार्थांचा) सुळसुळाट, भ्रष्टाचार, अनाचार या आघातांची सूची न संपणारी आहे.

आज राममंदिर निर्माण झाले; पण रामराज्य निर्माण झालेले नाही. राष्ट्र-धर्म यांवर होणारे आघात थांबवण्याचा एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे रामराज्याची, अर्थात् हिंदु राष्ट्राची स्थापना ! आदर्श राज्याचा मापदंड म्हणजे रामराज्य ! रामायणात श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर युद्ध कांडामध्ये रामराज्याचे वर्णन आहे. जेव्हा श्रीराम राज्य करत होता, तेव्हा कुणीही दुःखी नव्हते, जंगली जनावरांपासूनही कुणाला धोका नव्हता; आजारपण किंवा रोगराई नव्हती; चोर्‍यामार्‍या, लूटमार होत नव्हती; कुणामध्येही शत्रूता नव्हती; त्यामुळे युद्धाची भावना नव्हती. तरुणांचे अंत्यसंस्कार करण्याची वृद्धांवर वेळ येत नसे. प्रत्येक जीव सुखी आणि चारित्र्यवान होता. रामराज्यात श्रीराम सात्त्विक होता, असे नाही, तर प्रजाही सात्त्विक होती. असे रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणे, ही आजच्या काळातील गुरुसेवाच आहे.

५. रामराज्याचे साक्षीदार नव्हे, तर भागीदार व्हा !

‘असे आदर्श राज्य खरेच येईल का?’, अशी पुसटशी शंकाही मनात आणू नका. काळमहिम्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे रात्रीनंतर पहाट होते, तसे सध्या कलियुगांतर्गत कलियुग संपून कलियुगांतर्गत सत्ययुग चालू होण्याचा काळ समीप आहे. जसे ‘पहाट होणे’ कुणी थांबवू शकत नाही, तसे ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे निर्माण’ कुणीही थांबवू शकत नाही. ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. साक्षात् देवतांनी हे कार्य हाती घेतले आहे. आपल्याला निमित्तमात्र होऊन कार्य करायचे आहे. रामराज्याचे साक्षीदार नाही, तर साथीदार व्हायचे आहे. रामसेतु निर्माणाच्या कार्यात छोटीशी खारूताई तिच्या क्षमतेने सहभागी झाली होती. ‘खारूताईने सेतूवर वाळू टाकली नसती, तर सेतू निर्माण झाला नसता’, असे नाही. तरीही खारूताईने सेतुनिर्माणाच्या कार्यात तिचा सहभाग घेतला आणि रामरायाने तिला जवळ केले. आपल्यालाही रामराज्याच्या स्थापनेत आपल्या परीने सहभागी व्हायचे आहे. रामराज्यातील प्रजा धर्मपरायण होती. आपणही रामराज्यात रहाण्यासाठी आपली पात्रता वाढवली पाहिजे. अर्थात् साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे.

व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. आपले विचार आणि वर्तन हे हिंदु संस्कृतीला पूरक असायला हवे. ‘हॅलो’ नाही, तर ‘राम-राम’ म्हणणे, ही आपली संस्कृती आहे; ‘टीव्ही’वरील मालिका पहाणे नाही, तर ‘कीर्तनभजन’ पहाणे, ही आपली संस्कृती आहे; अभिनेता नाही, तर राम-कृष्ण हे आपल्या संस्कृतीने दिलेले आदर्श आहेत. वागण्या-बोलण्यातून, आचारातून आपण संस्कृतीची जोपासना करूया. धर्मपालन करूया. आदर्श रामराज्याच्या स्थापनेसाठी सत्सेवेमध्ये झोकून देऊया. रामराज्याची स्थापना होण्यासाठी रामरायाला प्रतिदिन प्रार्थना करूया. असे केले, तर रामराज्याची स्थापना दूर नाही.

६. आपत्काळ

रामराज्य येण्यापूर्वी  रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे. ३-४ वर्षांपूर्वी आपण कोरोना महामारीची भयावह स्थिती अनुभवली. जागतिक स्तरावरही गेले ३-४ वर्षे युद्धजन्य स्थिती आहे. रशिया-युक्रेन, तसेच इस्रायल-हमास यांच्यात युद्ध चालू आहे. इराणच्या संदर्भातही तणावाची स्थिती आहे.  तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, ते सांगता येणार नाही. द्रष्टे संत, तसेच भविष्यवेत्ते यांनीही आपत्काळाविषयी सांगितले आहे. एका संतांनी सांगितले की, ‘या काळात पंचमहाभूतांचे तांडव पहायला मिळेल.’ आपणही गेल्या काही वर्षांपासून बिघडलेले ऋतुचक्र अनुभवत आहोत. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे. त्यामुळेच गुरुपौणिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया.

‘गुरुतत्त्वाला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी सर्वांना शक्ती, बुद्धी आणि भक्ती प्रदान व्हावी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने अखंड प्रयत्नरत रहाण्याची प्रेरणा मिळावी’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला गुरुचरणी विराम देतो. नमस्कार.

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था