पूजा खेडकर यांच्याकडून पुणे पोलिसांसमोर उपस्थित रहाण्यास टाळाटाळ !

  • पुणे पोलिसांनी पाठवली दुसरी नोटीस
  • पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांवर केले होते छळाचे आरोप

पुणे – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी स्वत: उपस्थित राहून जबाब (उत्तर) नोंदवण्याची नोटीस दिली होती. पुणे पोलिसांनी नोटीस देऊनही पूजा खेडकर पुणे येथे १८ जुलै या दिवशी उपस्थित राहिल्या नाहीत. त्या अद्यापही वाशिममध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना पहिल्या नोटिसीला उपस्थित न राहिल्याने दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर यांनी त्यांचा वाशिम येथील मुक्काम २ दिवसांनी वाढवल्याची माहिती आहे. त्यांनी १८ जुलै या दिवशी पुणे पोलिसांसमोर उपस्थित राहून जबाब नोंदवणे आवश्यक होते; मात्र त्या उपस्थित राहिल्या नाहीत.

पूजा खेडकर यांनी २० जुलै या दिवशी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये उपस्थित राहून जबाब नोंदवावा, अशी दुसरी नोटीस पाठवली आहे.

यू.पी.एस्.सी.कडून प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट होणार !

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात एफ्.आय.आर्. (प्रथम माहिती अहवाल) प्रविष्ट करण्याचा निर्णय यू.पी.एस्.सी.ने (केंद्रीय लोकसेवा आयोगाने) घेतला आहे. पूजा खेडकर यांचे ‘आय.ए.एस्. केडर’ रहित करणे आणि सर्व परीक्षांसाठी त्यांना बाद करण्यासाठी ‘कारणे दाखवा नोटीस’ केंद्रीय लोकसेवा आयोग देते आहे, अशी माहिती यू.पी.एस्.सी.ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.